१० सप्टेंबर, २०१६

पतंग

आकाशी रंग
कुणी भलताच दंग
मी बेभान माझा
गगनात पतंग...

माळावर उभा
कसं तापलंय अंग
दूर आकाशात
गोत घेतोय पतंग....

मित्राच्या हातात चक्री
लपेटतोय धागा संथ
डोळे लागलेत नभाकडे
घेतोय गिरक्या पतंग....

दूर तुझ्या गच्चीवर
तु उभी निवांत
मंद झुळूक वा-याची
नसानसांत सुगंध.....


रघुनाथदादा पाटील

होता हसरा तरिही ....

होता हसरा तरिही
चेहरा सांगत होता
सारेच खोटे आहे
हा फक्त मुखवटा होता.....

बोलणे लाघवी होते
विद्वान ऐकीव होता
फसवा हा अंदाज त्याचा
शब्दांतून ठिबकत होता....

राखीव हास्य होते
शब्दांचा सोहळा होता
असा लुबाडण्याचा
तो कुटील डाव होता....

सावज समजून ज्यांनी
केली प्रशंसा माझी
स्वार्थात डबडबलेला
मुद्दा पाळीव होता....

मुखवटा गळून पडला
डाव साधला होता
असा शहाणा धोरणी
वरकरणी मित्र होता!

रघुनाथदादा पाटील
25 फेब्रूवारी 2015

झाकायचे दु:ख जेंव्हा ....

झाकायचे दु:ख जेंव्हा
जाहीर करत गाली
आसवे किती ही भोळी
येतात अवेळी खाली!

लपवायचा आनंद होता
दाखवून अश्रू गेला
डोळ्यांच्या कडा ओल्या
सांगून गुपीत गेला....

जगण्यातील दु:ख माझे
नेतात दूर वाहून
करतात भार हलका
खरे सोबती  होऊन ....

शोधाया भूतकाळ माझा
न दूर जावे लागे
डोळ्यांत लपलेत भेदी
फिरतात असावांच्या मागे

मी कधीच एकटा नव्हतो
आसवांचे मेघ डोळी,
घन गर्जत होते
अन ओल्या होत्या ओंजळी!

रघुनाथदादा पाटील
औरंगाबाद,
24/07/2015





बाजार नियमनमुक्ती - रघुनाथदादा पाटील


शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळावा दलाल आणि आडत्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवून शेतमालाची विपणन व्यवस्था सांभाळणे, तसेच बाजाराचे नियमन करणे हे बाजार समितीचे प्रमुख उद्देश्य आहेत.
कार्यक्षेत्रातील 13 शेतकरी प्रतिनिधी, 1हमाल मापाडी प्रतिनिधी आणि दोन व्यापारी प्रतिनिधी अशी समिती  व प्रशासनाचा प्रमुख म्हणून सचिव अशी बाजार समिती कार्यरत असते.
शेतमालाची हमी दरापेक्षा कमी दराने विक्री होऊ नये, तसेच बाजाराची देखभाल करतांना हर्राशी प्रक्रीया पार पाडायला लागते. खरेदीदार, आडते दलाल यांना अनुज्ञप्ती द्यावी. त्यातील अटीनुसार नियंत्रण ठेवावे. मुक्त वातावरणात खुली हर्राशी व्हावी असे असतांना खरेदीदार रिंग करतात. अशा वेळी बाजार समितीने आपली भुमीका बजावने गरजेचे आणि अपेक्षीत असते. परंतु व्यापा-यांशी संबंधीत आर्थीक व्यवहार आणि भ्रष्टाचार यामुळे व्यापा-यांचाच वरचष्मा असल्यामुळे सर्रास रिंग करून शेतकरी नागवला जातो. शेती उत्पन्न बाजारात विक्रीस आल्यावर माल ओला किंवा कमी प्रतीचा असे सांगून हमी दरापेक्षा कमी भावात खरेदी विक्री होते.

बाजार समिती कागदाला कागद लावायचा म्हणून एक परिपत्रक फिरवते. बाकी कुठलेही नियंत्रण नसते. त्यातच परपेठचा आलेला शेतमाल जसे शेंगदाना वगैरे चा संपुर्ण व्यवहार आणि त्याच्या हिशोबपट्ट्या न बनवता बराचसा माल खरेदी विक्री होतो, त्यात लाखो रुपयाची बाजार फीस आणि शासनाची सुपरविजन फीस परस्पर तडजोड करून सभापती, संचालक सदस्य आणि कर्मचारी वाटून घेतात.
सरसकट सगळ्याच कामात इतर स्थानीक स्वराज संस्थांप्रमाणे 2% कमिशन घेऊन भ्रष्टाचार केला जातो. या समित्या भ्रष्टाचाराची कुरणे बनल्यात. कर्मचा-यांना वेतन आयोग उशीराने  लागू करायचा आणि फरक पदाधिकारी आणि सदस्यांनी वाटून घ्यायचा अशी नित्याचीच बाब. कधीकाळी प्रशासक नियुक्त केला तर तोही त्याच सगळ्या वाटांवरून वाटचाल करतो. ही बाब जिल्हाउपनिबंधक किंवा सहकार विभागाचे अधिकारी जाणत नाही असे नाही, तर लेखापरिक्षक ते सामान्य कारकूनापर्यंत सगळ्यांचेच हाल ओले केले जातात. जो या व्यवस्थेच्या आड येतो त्याच्यावर भ्रष्टाचार किंवा काहीतरी ठपका ठेवून त्याचा कडेलोट केला जातो.

लेखापरिक्षक तर दोन दोन अहवाल बनवतात. आधी खरा अहवाल बनवून तोडीपाणी करतात मग दुसरा सगळे सुरळीत असल्याचा अहवाल देतात. बांधलेले गाळे सदस्य आणि पदाधीकारी स्वत:च्या नावाने किंवा नातेवाईकांच्या नावाने घेतात.

शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसेल तर समितीने कारवाई करायला हवी पण व्यापा-यांचे वर्चस्व आणि राजकारण, आर्थीक स्वार्थ, कर्मचा-यांचे अज्ञान, भ्रष्टाचार या सगळ्या कारणाने या समित्या शेतक-याला रास्त भाव मिळवून देण्यात अथवा त्यांच्या विकासात हातभार लावण्यात सपशेल अयश्स्वी ठरल्यात.

बाजार समितीने विपणन व्यवस्थेकडे लक्ष द्यायचे झाल्यास गावोगाव असलेल्या सहकारी सोसायट्यान्मार्फत माल स्वच्छ करून प्रतवारी करायला हवी. बाजार समितीने पॅकेजिंगची व्यवस्था करून शेतक-यांचा माल शॉपींग मॉल मध्ये उपलब्ध करून मध्यस्त आणि दलाल यांचा नफा कमी करायला हवा. असेही ह्या शॉपींग मॉलला अनुज्ञप्ती बाजार समितीकडूनच घ्यावी लागते.

त्यात  शेतक-यांचा माल विक्रीसाठी ठेवायची अट टाकावी. एकतर ग्राहकांना मध्यस्तांच्या नफ्याशिवाय स्वस्तात माल मिळेल आणि शेतक-यांना त्यांच्या मालाचा रास्त मोबदला मिळेल. यातून निश्चीतच शेतकरी आत्महत्या कमी होतील. तसेच ह्या समित्यांवर शासनाने एक अध्यक्ष नियुक्त करावा. निवडणूका असल्याने त्यासाठी मत विकत घेण्यासाठी उमेदवारांकडून लाखोंचा खर्च केला जातो. त्यातून मग केलेला खर्च वसूल करायचा म्हणून भ्रष्टाचार केला जातो. यासाठी तडजोड होती ती व्यापा-यांसोबत आणि बळी पडतो तो बिचारा शेतकरी.
ग्राहकाभिमुख बाजार केंद्रे सुरू करावी. ज्याला जिथे वाटेल तिथे माल विक्री करायची मुभा असावी. ह्या समित्या बंद झाल्यास सगळे कर आणि खर्च कमी होऊन ग्राहकांना स्वस्तात अन्नधान्य मिळेल.

तिफणीच्या मागे

तिफणीच्या मागे मी चालतो
काळ्या मातीला साद घालतो

ज्याने तिची कुस पोखरते
त्या फाळाला माती ओळखते
कुशीतून जीव अंकुरतो
काळ्या मातीला साद घालतो!

पेरणीला होतं चाडं
मागे संसाराचं गाडं
गाडं हाकतो हाकतो
काळ्या मातीला साद घालतो

काळ्या मातीला साद घालतो
तिफणीच्या मागे मी चालतो

नभ काळेभोर झाले
माती सैरभैर झाली
पावसाच्या थेंबाने
तिची काया मोहरली

तिची काया मोहरली
तिचा जीव सुखावतो
तिफणीच्या मागे मी चालतो
काळ्या मातीला साद घालतो

रघुनाथदादा पाटील
औरंगाबाद
२६ ऑगस्ट २०१६

आज मला दिसते तू


डोळे पाणीदार
गाल गुलाबी
ओठांच्या पाकळ्या  इवली हनुवटी
कानाsतली बाळी
टिकली कपाsळी
हातात बांsगडी अन लाल साssडी
उघड्या डोळ्यात आज मला दिसते तूss
घरी दारीss  दुपारी मला दिसते तूss
तुझी आन मला झोपेतहीs दिसते तूss
अशी ध्यानी मनी सगळीकडे वसती तूss ....
गोरी ही कांती
रेखीव बांssधा
कृष्णाची जशी हीss    बावरी राधा
कटी कमनीय
कटी कमनीय
देहाचे वळण मादक ग
घड्याळाच्या काट्यात निमिष टिक टिक तू
डोळ्यांच्या माझ्या पापणीची मिट मिट तू
माझ्या ह्र्दयाची हाक अशी धक धक तू
अशी ध्यानी मनी सगळीकडे वसती तू ....
गोरी नवरी
मांडवातली
कधी भासते  तिची करवली
हात गुंफले
मंजूळ बोलणी
डोळ्यांची उघडझाप मिठठास वाणी
आगीनगाडीची बेधडक झूक झूक तू
गोड रानोमाळ वाजणारी  शीळ तू
गळा घातली ही मोत्याची माळ तू
अशी ध्यानी मनी सगळीकडे वसती तू ....


गीतकार : रघू व्यवहारे
15 जानेवारी 2016
मकरसंक्रांत

पाऊस .....

आजच्या पावसात माझे
अभ्यासाचे दप्तर ओले
केसांसोबत कपड्याचे
मलमली अस्तर ओले,

अस्तराच्या आतली
काया ओलीचिंब
निथळताहेत केळीचे खांब
पोटऱ्या आणि स्कंध

ओलेत्या देहाने
झेलला हा गारवा
आत खोलवर पेरणी
मनात भिरभिरतोय पारवा

आता थांबले कडेला
रिमझिम रिमझिम धारा
माळला होता असा हा
केसांत पाऊस सारा

कुणीतरी यावं
अन सोबत धुंद व्हावी
अंकुरल्या देहाला
मिठी बेधुंद मिळावी!

रघू व्यवहारे
सिडको एन ८ औरंगाबाद



ऐ जिंदगी .....

थक गया हुं जिंदगी
अब और नही सहा जाता,
सबको मुझसे उम्मीदे है
और मुझसे कहा नही जाता!

जब भी मै दौडता हुं
मेरे अपने पिछे छूट जाते है
उन्हे साथ लेकर
अब रास्ता काटा नही जाता!

मुझे भला-बुरा कहनेवाले
मेरे नामसे जलते थे
जब ध्यानसे देखा तो
उसमे पराये नही थे!

चेहरोंको पढ न पाया
मेरा सर झुका था
जिनके कदमोंपर मेरी नजरे थे
उनकी आंखोंमे धोखा था!

सबको कुछ चाहत थी
इसलिये मेरा वजूद जिंदा था
उनके काम निपट गये
अब मै सिर्फ बोझ था!

रघुनाथदादा पाटील
औरंगाबाद.


किती पाहू तुझी वाट...

किती पाहू तुझी वाट
किती पाहू घड्याळात
काटा रुसून बसला
वेळ थांबला दारात!

डोळे तुझ्या वाटेवर
क्षणाक्षणाची पाळत
एक एक क्षण असा
जावा धावत पळत

तुझी वेळ व्हावी
अन तू धावत यावी
एकटक  नजरेला
थोडी उसंत मिळावी

वेळ पुढे सरकेना
द्वाड जागीच थांबला
माझा श्वास असा कसा
थोडा उगीच लांबला

जीव कासावीस झाला
आता धीर धरवेना
डोळा नित वाट पाहे
जीव वाटेत गुंतला

वारा वाहे खट्याळ
अन धुंदी संचारली
चित्त चित्तात रंगलं
तुझी चाहूल लागली

रघुनाथदादा पाटील
औरंगाबाद
८ जुलै

Thank you!

श्रेयाचे वडील आले अन हिला म्हणाले," मला सरांना भेटायचय!"
सर नाहीयेत घरी. का? काही काम होतं का? ही म्हणाली.
"हो, मला सरांना thank you म्हणायचं होतं!"
"म्हणजे? "
"त्याचं काय झालं मॅडम काल आम्ही ; म्हणजे मी आणि श्रेया बाहेर चाललो होतो माझ्या दुचाकीवर. श्रेयाची सारखी बडबड चालूच होती. आम्ही जात असतांना रस्त्याच्या कडेला एक माणूस एका कुत्र्याच्या पिलाला दूध पाजत होता. पिलू पार मरायला आलेलं!
श्रेया म्हणाली," पप्पा ते बघा! "
मी म्हणालो, " हो, पाहिलं मी!"
ती म्हणाली , " चला त्यांच्याकडे"
मी गाडी थांबवून श्रेयाकडे पाहिले आणि म्हणालो, " त्यात काय एवढं जवळ जावून पाहण्यासारख?"
यावर ती म्हणाली," त्या काकांना म्हणा ते खूप छान काम करताहेत म्हणून!"
मी तिच्याकडे पाहून हसलो आणि म्हटलो," काहीतरीच!"
ती म्हणाली, काहीतरीच नाही, त्यांच्याशी बोला."
मी त्या माणसाजवळ गेलो, त्यांच्याकडे पाहून हसलो. ते ही हसले. मी त्यांना विचारलं, " तुमचा कुत्रा आहे?"
ते म्हणाले," नाही. हे पिलू पावसात भिजलेलं आणि खायला काहीच मिळालं नसेल म्हणून असं रस्त्याच्या कडेला पडलेलं होतं!"
"तुम्ही खूप छ्हान काम करताय!" मी म्हणालो.
त्यावर ते हसून म्हणाले," Thank you! पण ह्यात फार मोठं असं काहीच नाही!.
गप्पा मारता मारता त्या माणसाचा हळवेपणा कळला. आपसूकच नाव गाव विचारून झालं. आमची कित्येक दिवसांची ओळख असल्यासारखे आम्ही अर्धा तास गप्पा मारत उभे राहीलो. मला एक छान मित्र मिळाला.
आपल्या अवतीभवती कित्येक लोक असे कुठल्याही प्रसिद्धीशिवाय एवढं छान काम करत असतात, गरज आहे फक्त आपल्याशिवाय इतरांकडे पाहण्याची. आणि त्यांच्या कामाची दखल घेण्याची! श्रेयामध्ये ही जाणीव निर्माण झाली ह्याचे मला मनापासून नवल वाटले!
तिथून मी आणि श्रेया घरी आलो. मी तिला विचारलं," तुला असा विचार कसा सुचला?"
खरं तर मला वाटलं असा विचार आपल्याला का नाही सुचला?
मला तिचा प्रचंड अभिमान वाटला!
ती म्हणाली, " आमचे सर आम्हाला नेहमी म्हणतात, आपण वाईट असेल तर लगेच तोंडावर बोलतो पण चांगले बोलायचे असेल तर दहा वेळा विचार करतो. कुठे काही मनाला आनंद देणारी कृती दिसली तर आवर्जून अशा लोकांचे कौतूक करा. जावून त्यांच्याशी बोला. जे वाटलं ते सांगा. त्या व्यक्तीला छान वाटेल पण तुम्हाला देखील आणखी आनंद मिळेल!"
तिची एवढी छान जडनघडण होतीये, एवढी संवेदनशील आणि छान वागणारी मुलगी आपली आहे ह्याचा मला मनापासून आनंद झाला. मला जगण्याच्या धावपळीत मुलांकडे लक्ष द्यायला खरंच वेळ नाही मिळत आणि शाळेत शंभर शंभर मुले एकेका वर्गात. अशा वेळी मुलांकडे एवढ्या सुक्ष्म पातळीवऱ कुणी तरी लक्ष देतंय ही प्रचंड समाधानाची बाब आहे.
आणि म्हणूनच मी सरांना Thank you! म्हणायला आलोय.

for more details : visit facebook page