३० डिसेंबर, २०१४

जानी दुश्मन - एकांकिका (लेखक : रघुनाथदादा पाटील)

जानी दुश्मन प्रवेश 7
( दिवाणखाण्याची रचना. विजय लॅपटॉपसमोर बसलेला. दादा ऑफीसची फाईल चाळतोय.)

(पार्श्वभूमीवर
एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात....)

रंगमंचावर प्रकाश.

दादा : ( फाईल मांडीवर ठेवून हातात पेन)
अरे विजय, तुला एक सांगायचंच राहून गेलं.

विजय : काय दादा?

दादा : अरे ते रिबीन फूल दिल्यापासून माझा बॉस काय बदलला.....
अगदी अंतर्बाह्य बदलून गेला. ऑफीसातले सगळे चकीत आहेत.
सगळ्यांशी आता प्रेमाने वागतो.
एवढंच काय, सगळ्यांसोबत कॅबीनच्या बाहेर येउन बसतो.
अधूनमधून एकदम हळवा होतो.
खळखळून हसतो.....पण त्याच्या आत एक वेदना लपलेली दिसते.....
त्याची  पत्नी वारल्यापासून दगडासारखा कडक झाला होता.....

आता त्याच्या मुलाबद्दल सतत काही ना काही सांगत असतो.

विजय : म्हणजे जानी दुश्मनची प्रेमाची मात्रा लागू पडली म्हण की....

दादा : अरे, एखाद्या क्षणी माणूस असा अंतर्बाह्य बदलू शकतो हे मान्यच होत नाही.

बाकी तुझा जानी दुश्मन एक अवलीया आहे......
कसं सुचतं रे हे त्याला?

विजय : दादा, तुला आठवतं ...... आम्ही त्या दिवशी थर्मोसफ्लास्क मध्ये चहा घेउन गेलो होतो.....

दादा : अरे हो.....कुठे गेला होता तुम्ही दोघं?
मला वाटलं कुणी दवाखाण्यात आहे की काय?

विजय : दादा, त्या दिवशी आकाशवाणी चौकातल्या वाहतूक पोलीसाला देखील रडवलं ह्या भाउने.....
खूप हळवा झाला होता तो!
मलाही भरून आलं होतं.....

दादा : अरे हा असा मस्तमौला माणूस तुझा मित्र आहे.....मला फार हेवा वाटतो तुझा.....
सांभाळ त्याला....

विजय : हो दादा.....
पण मी काय सांभाळणार?
तोच मला सांभाळतो.....

दादा : अशा हळव्या लोकांच्यात एक लहान अत्यंत निरागस मुल लपलेलं असतं. अत्यंत भावनिक आणि सरळ असतात अशी लोकं! तेवढीच लवकर कोलमडून पडतात.
तुझ्यावर फार जीव आहे त्याचा.....
त्याला जप....

विजय : दादा, त्या मागणा-या बाईच्या मुलाला शाळेत पाठवलं त्यानं.

दादा: काय सांगतोस?

विजय : त्याचा शाळेचा खर्च भरतोय हा भाउ....
मीही माझा वाटा उचलला त्यात.....
पण हा असा वेगळाच आहे. म्हणून कधी कधी एकटा पडतो....फारसे मित्रही नाहीत त्याला...
असंही फेसबूकवरच्या शेकडो मित्रांपेक्षा मोजके का होईना ..... असे असावेत! 

दादा : अरे आपल्या सगळ्या बगळ्यात राजहंस आहे तो.....
ती ग. दि. मांची ती कवीता आठवते का तुला?
एका तळ्यात होती
बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक....

पार्श्वभूमीवर ही कवीता चालू...
मागे पडद्यावर श्रेयनानावली.....

समाप्त.

जानी दुश्मन - एकांकिका (लेखक : रघुनाथदादा पाटील )

प्रवेश 6

(रंगमंचावर मागील पडद्यावर बेडरूमचा देखावा. निळसर प्रकाश. समोर उजव्या कोप-यात खुर्ची. त्या खुर्चीवर spot light.)

(बॉस ऑफीसमधून घरी येतो. बूट आणि सॉक्स काढतो. हातातील बॅग बाजूला ठेवून टायची गाठ सैल करतो. थकून काही क्षण खुर्चीवर बसतो. डोळे मिटून बसतो. एक सुस्कारा सोडतो.)

(थोड्या वेळात खिशाला हात लावतो. काहीतरी आठवले..... खिशातून फुलांची रिबीन काढतो....आता प्रकाश पुर्ण रंगमंचावर.... मागे एक मुलगा झोपलेला. पोटाशी घेउन झोपलेला.)

बॉस : (त्याच्या जवळ जात, बाळाच्या डोक्यावर हात फिरवतो.)
झोपलायस बाळा.... गाढ झोपलायस....... आज मला खरंच जाणीव झाली. मी फार वाईट आहे.....प्रकर्षाने तुझ्या आईची आठवण येतीये.....

(डोळे पुसतो.)

मी तुझ्यावर सतत डाफरत असतो.... रागावत असतो.......अरे तुझ्यावरच काय ..... सगळ्यांवरच मी डाफरत असतो.

छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुझ्यावर रागावतो. तुझ्या वस्तू इथे तिथे पडल्यात म्हणून रागावतो.....

ऐकतोस ना बाळा ....

मी सतत रिंगमास्तरसारखा तुला शिकवत असतो. किरकोळ कारणांसाठी रागावतो.तुझ्यातले फक्त दोष पाहतो मी!

तू गोट्या खेळतांना तुझा आनंद पहायचा सोडून मातीत नको खेळूस म्हणून गुरकावतो......

तुझं खेळतानाचं लोभस रुपडं डोळ्यात साठवायचं सोडून तुला हाताला पकडून तुझ्या सवंगड्यांसमक्ष ओढत आणलं.......

तुझे कपडे मळलेत, सॉक्स कढून नाही ठेवलेत म्हणून तुझ्यावर रागावलो.

मी वाचतांना तू जवळ आलास की आता तू त्रास देणार, आवाज करणार म्हणून मीच आधी ओरडलो.....काय हवंय तुला आता?

तू काहीच न बोलता धावत आलास ......
माझ्या गळ्यात हात टाकून माझा पापा घेउन पळून गेलास ....... तुझा तो निरागस स्पर्श.....

तुला घडवायच्या नादात मी कधी बिघडलो तेच कळलं नाही मला.

मला माझ्या वागण्याचीच लाज वाटतीये.....माझा तिरसटपणा....दोष काढण्याची सवय.....
पण खरं सांगू.....
मला तू आवडतोस.....किंबहुणा तू प्राणप्रिय आहेस!
मला तू प्राणपप्रिय आहेस!

माझ्या वयाच्या फुटपट्टीने मी तुझं बालपण मोजून बंदीस्त केलं होतं......मी तुझ्याकडून फार अपेक्षा केल्या.....प्रौढासारख्या अपेक्षा!

तू जेवतांना मला तुझं ते माखलेलंतोंड पाहून आनंद व्हायच्या ऐवजी तुझं ते भराभरा घास गिळणं पाहून राग यायचा.

मी ऑफीसला जातांना तू मागून आवाज द्यायचास....मी ओरडायचो....
आता काय?
तर तू हळूच इवल्याशा हाताने टाटा करायचास......

किती राक्षसारखा वागलो रे  बाळा मी......
मला माफ कर....
माफ कर....

खरंच ....खरंच तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आनंद निर्माण झालाय..... मला तू खूप आवडतो.....

(बाळाच्या डोक्यावर हात फिरवत....)
thanks बेटा!
thanks!

हातपाय पोटाशी घेउन कसा गुडूप झोपलायस....
माझ्या नपट्या....
टिंग्या.....

I love you!
( त्याच्या अंगावर पांघरून घालतो. आणि ते रेबीन फूल त्याच्या उशाशी ठेवतो.)

पार्श्वभूमीवर
मुस्कुराने की वजह तुम हो.......

जानी दुश्मन - एकांकिका (लेखक : रघुनाथदादा पाटील)

जानी दुश्मन प्रवेश 5
( रंगमंचावर ऑफीसची रचना. मागे पडद्यावर कॅबीनमधून बाहेरचे कार्यालय आणि कर्मचारी दाखवणारी चित्राची फ्रेम!)

दादा : मे आय कम इन सर?

बॉस : येस, कम इन!

दादा : सर.......सर........

बॉस : लवकर बोला. इथे आपण सर सर खेळायला नाही आलो......पटकन बोला.

दादा : सर, मला तुम्हाला thanks म्हणायचंय ! तुम्हाला हे फूल द्यायचे!
तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात आनंद निर्माण झाला.
म्हणून thanks!

बॉस : (थोडसं चकीत होउन सतीष दादा कडे पहातो. उठून जवळ येतो.)
खरंच ......खरंच तुला मनापासून असं वाटतं?
तुला वाटतं की माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात आनंद निर्माण झाला म्हणून?

दादा : हो सर, अगदी खरं! तुम्ही वरून कडक वाटता पण  आतून फार संवदनशील आहात!

बॉस : आजपर्यंत मी कुणाशिही कधीच हसून बोललो नाही.....सतत फक्त काम अन काम.....
अरे एवढंच काय, निशा गेल्यापासून मी माझ्या बाळासोबत देखील हसलो, खेळलो नाही.
(डोळ्यात कचरा गेल्याचा बनाव करत बॉस हळूच डोळ्याच्या कडा पुसतो.)

ए अरे, तुझ्याकडे आहे अजून अशी फुले?

दादा : हो. आहेत ना. ( खिशातून जानी दुश्मनने दिलेली रिबीनची दोन फुले बॉसला देतो!)

बॉस : thanks!

पार्श्वभुमीवर बहती हवा सा था वो चे संगीत ...

रंगमंचावर काळोख blackout

जानी दुश्मन - एकांकिका (लेखक : रघुनाथदादा पाटील)

प्रवेश 4

जानी दुश्मन: विजय विजय विजय.......(विजयचे हात पकडून त्याला गोल गोल फिरवतो.....)

विजय : अरे अरे हो....हो..... आज अचानक काय झालं?

जानी दुश्मन : तुला काय सांगू..... मी इथे घरादारापासून दूर..... आईवडीलांपासून दूर....पण या घराने मला त्यांची उणीव भासू दिली नाही.....

विजय : काय झालं काय? आज असा गहीवरलास का एकदम?

जानी दुश्मन : मित्रा, तू खरंच माझ्या आयुष्यात आनंद पेरलास.....तुझ्यासोबत मी सगळं जग विसरतो.....तू मला समजून घेतोस.....नेहमी सोबत करतोस...... तू मनाने खूप हळवा आहेस.....मला खरंच तू खूप आवडतोस!

(खिशातून एक रिबीन काढतो, तिला असे ओढतो की तिचे एक छान फूल तयार होते.....ते फूल विजयच्या शर्टाच्या खिशाला लावतो.)

जानी दुश्मन : thanks मित्रा!!

विजय: thanks!  कशाबद्दल? आणि मला?

जानी दुश्मन : या घरात मला आई, वडील, भाउ, वहिणी अशी सगळी नाती मिळाली...... आणि माझ्या मैत्रीवर जीव ओवाळून टाकणारा तुझ्यासारखा मित्र!

विजय : हे रे काय? त्यात thanks काय रे.....
(अत्यंत भावनिक होउन दोघे मित्र एकमेकांना मिठी मारतात.)

(तेवढ्यात दादा चा प्रवेश)

दादा : काय संपली का भरतभेट?

विजय : दादा, ही भरतभेट नाही काही..... फार तर कृष्ण - सुदाम्याची भेट म्हण.....

दादा : म्हणजे तुला कृष्ण सुदामा माहीत आहे तर?

( विजयच्या खिशाला लावलेल्या फुलाकडे पहात) अरे वा! हे फूल कसले? कुणी दिलं? मैत्रीणीने दिलं की काय? (हसतो)

विजय : नाही रे, मैत्रीणीने नाही.....
या माझ्या जानी दुश्मनने.....

दादा: का?

विजय : माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला म्हणून!

दादा : अरे वा! छानच!
आपण जिथे तिथे फक्त उणीवा शोधतो तिथे फक्त चांगुलपणा शोधून अधोरेखीत करणे फक्त करू शकतो.....

विजय : मग.....मित्र कोणाचा आहे!

दादा : ए ललीत, मला दे ना रे असे फूल! मी जरा माझ्या खडूस बॉसला देतो......साला पार छळतो रे! तो तरी बदलेल अशाने थोडाफार!

जानी दुश्मन : दादा, तू खरंच दे तुझ्या बॉसला. नक्की त्याच्या आतल चांगला माणूस जागा होईल!

(खिशातून आणखी रीबीनची फुले दादाला देतो.)
आणि दादा, तुझ्या आयुष्यात आनंद निर्मण करणा-या खास लोकांना तू हे फूल दे!

पार्श्वभूमीवर बहती हवा सा था वो चे music चालू.

(रंगमंचावर अंधार - blackout)


जानी दुश्मन : एकांकिका (लेखक :रघुनाथदादा पाटील)

प्रवेश 3

जानी दुश्मन प्रवेश 3
(ऎन सनासुदीचे तीन दिवस बेपत्ता झालेला जानी दुश्मन आज अचानक अवतरला.)

जानी दुश्मन : वहिणी.....
जानी दुश्मन: अरे वा..... विजय ..... तू अन पुस्तक......(हसायला लागतो, विजय त्याच्याकडे वरवर रागाने पाहतो.)

जानी दुश्मन : वहिणी, मला खूप भूक लागली, काही खायला द्या ना."  

काय दादा, आज ऑफीसला नाही गेलास? आज सुटी आहे का?

दादा: नाही रे..... कसली सुटी..... तो खवीस बसलाय ना ऑफीसात......माझा बॉस.....

विजयची वहिणी : (आतून) भावजी फ़क्त दोन मिनीट हं.

विजय: वहिणी मॅगी करताहेत का, ’बस दो मिनीट’.

वहिणी: ( आतूनच बोलतात) आत्ता करते गरमा गरम कांद्याचं थलिपीठ.

जानी दुश्मन : वहिणी काही करत बसू नका, जे असेल ते द्या. फ़रसान, चिवडा काहीही चालेल.

विजय: कुठे होतास तीन दिवस?

जानी दुश्मन : ईथंच होतो रे.

जानी दुश्मन : मग लक्ष्मीपुजनाला का नाही आलास? गावाकडे खपला होतास का?

जानी दुश्मन : नाही रे इथंच होतो, जरा कामात होतो."
(जानी दुश्मनने  पेपर हातात घेतला, अन बातम्या चाळू लागला. बाहेर एक मागणारी बाई येतांना दिसतेय.....आता रंगमंचावर निळा रंगाचा प्रकाश........ )

                  ( बाहेर ताशा वाजवण्याचा आवाज येऊ लागला. काय वाजतय हे पाहण्यासाठी विजय आणि जानी दुश्मन दोघं दरवाज्यात जाउन ऊभं राहीले. एक रंगानं काळी-सावळी.... कसली काळी-सावळी एकदम काळीकुळीत बाई ताशा वाजवत होती. कळकट  साडी, केसांच्या झिंज्या झालेल्या..... सोबत एक सात आठ वर्षाचा मुलगा. खाली फ़्रॉक, वरती ऊघडाबंब. कपाळावर रंग  फासलेला, गळ्याला, कानाला, गालावर रंग फ़ासलेला. हातात एक सोट घेउन स्वतःला मारतोय. कडाड-कडाड आवाज करत स्वतःला सोट मारतोय. बाई वाजवतीय..)

मागणारी बाई : (केवीलवाणा चेहरा करून)

साळीच्या साळवंट्या केळीच्या कळवंट्या,
बहिण आमची नारळी माय आमची तळहातावरी,
महानभवाळ आमचा आजा बाप पिरथमीचा राजा. भाकर वाढ ओ माय!

काही दानधर्म करा, पाच रुपये द्या ना दादा.

विजय : काय पण अवतार आहे साला! मला बिलकूल दया वाटत नाही अशा लोकांची...... उलट मला तिची किळस वाटतेय.... (तोपर्यंत तो मुलगा समोर येतो. दादा  दारात येऊन या दोघांच्या पाठीशी येउन उभा राहिला.)

दादा :  अरे ह्यो भो सरळ घरात घुसते की काय? )
          तुम्ही आत या अन दरवाजा लोटून घ्या.

विजय : चल रे आत चल. ह्यांना कामधंदा करायला नको, नुसतं आयतं बसून खायला हवं.

                  (तो छोटा मुलगा कडाकड अंगावर सोट ऊठवतोय. त्याची आई ताशा वाजवतीय)

मागणारी बाई : (काकुळतीला येऊन विनवणी करतीय...एकदम लाचार...)
काही दानधर्म करा, पाच रुपये द्या ना दादा.  (विजय  अजुनही बाहेर पाहतोय, विजयला तिच्या वाजवण्याचा त्रास होतोय.)

मागणारी बाई : (बाईचा आवाज आता कर्कश्श....)
साळीच्या साळवंट्या केळीच्या कळवंट्या,
बहिण आमची नारळी, माय आमची तळहातावरी,
महानभवाळ आमचा आजा, बाप पिरथमीचा राजा. भाकर वाढ ओ माय!
वाढ ओ माय....गरीबाला दान दे... भीक दे...तुहे पोरं सुखात राहतील.

(पार्श्वभूमीवर रेडीओ वर बातम्या लागल्या.  मराठवाड्यातील कुपोषनाची बातमी ऐकून  त्या कुपोषीत मुलांबद्दल विजयला त्यांची कणव आली.)

(कुपोषनाची बातमी : नमस्कार,
हे आकाशवाणीचे औरंगाबाद परभणी केंद्र आहे.....
आजच्या ठळक बातम्या...

आर्थिक दृष्ट्या सधन व शेतीमध्ये संपन्न असणाऱ्या औरंगाबाद तालुक्‍याच्या ग्रामीण
भागात अजूनही शंभरहून अधिक बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांची आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली तीमध्ये ही कुपोषित बालके आढळून आली आहेत. 

राज्यातील मेळघाट भागात कुपोषित बालकांचे प्रमाण मोठे आहे. येथील बालकांचे कुपोषण थांबविण्यासाठी शासनाने तेथील मुलांना सकस आहार व औषधे मोफत देऊन तेथील कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र औरंगाबाद तालुक्‍यासारख्या जागृत व प्रगत असणाऱ्या भागात अजूनही कुपोषित बालके आढळून येत असल्याने येथील आरोग्य विभागाच्या कामाबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे.)

(विजय उठून रेडीओ बंद करतो)

विजय : सालं सरकार, काही उपाययोजना करतं की नाही.

जानी दुश्मन : .............................

विजय : लोकांनी तरी अशा गरीब कुपोषीत मुलांना  खायला द्यावं यार....

(दादाने तोपर्यंत कांद्याचं थालपीठ आणलं आणि या  दोघांच्या हातात दोन प्लेट दिल्या.)

जानी दुश्मन :   (एक घास खाल्ला. दुसरा तुकडा मोडला, अन काहीतरी स्वगत बोलत प्लेट घेऊन ऊठला.)

विजय : काय म्हणालास?

जानी दुश्मन : (दरवाजा ऊघडून अंगणात.) ए मावशी .......... (त्या बाईला आवाज दिला. तिला बोलाऊन बसायला सांगितलं. अन हातातली प्लेट तिच्यासमोर केली.)

विजय : अरे, हे काय रे? रात्रीचं आहे ते देऊ ना आपण तिला.

जानी दुश्मन  : .................................

विजय :  वहिणी रात्रीची पोळी-भाजी आणा बरं.

जानी दुश्मन : ती राहू दे, ती मी खातो.

विजय : अरे साजूक तुप लावलेलं थालपीठ होतं.
        रात्रीचं दिलं असतं ना तिला. (तोपर्यंत ती बाई अन तो मुलगा थालपीठ बकाबका खाऊ लागले.  खूप भुकेले होते बहुदा. त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहत जानी दुश्मन कुठेतरी हरवलेला.  त्यांच्या पोटात अन्न गेल्याने ते सुखावले. चेह-यावरची तृप्ती पाहून विजयलादेखील बरं वाटलं. दादाने  आणखी थालपीठ वाढलं. त्यांना पाणी दिलं.)

जानी दुश्मन : शाळेत नाही जात का रे बेटा?

(मुलगा फक्त नकारार्थी मान हलवतो. तोंडात घास... )

मागणारी बाई : अरं बाबा, हिथं दोन यळचा तुकडा भेटंना पोटाला, अन कसली साळा घीउन बसलायस.....

विजय :  सालं आत्ता दोन मिनीटापुर्वी कुपोषीत मुलांबद्दल ऐकून मी वांझोटी सहानुभूती दाखवत होतो. प्रत्यक्ष कृती मात्र शुन्य. एखाद्या न्युज चॅनलवर जशी चर्चा करून आपण फ़ार मोठं समाजकार्य करतोय, अन आपल्याला कुणालाही कसलेही प्रश्न विचारायची मुभा आहे असं समजणा-या संपादकांसारखी माझी अवस्था आहे. प्रत्येक ईश्यु कॅश करणे एवढाच हेतू असण्यासारखं होतं ते.
         
 सालं आपण समाजसेवा करायची म्हणतो ते पण शिळं पाकं, फ़ेकायचं अन्न असं खायला देऊन. तेच अन्न स्वतः खाऊन हातातलं ताट असं देण्यासाठी फ़क्त जानी दुश्मनच हवा. आपला तो पिंड नाही.आपण शिळंपाकं अन्न देऊन पुण्य कमावल्याच्या भ्रमात वावरतो.

           (तांब्या भर पाणी पिऊन ती बाई अन तो मुलगा तृप्त झाले. त्या लहाणग्याला असं पाहून दादाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांने डोळ्याच्या कडा टिपल्या.)

विजय :  माझी मलाच लाज वाटतेय. आपण ह्याच्या पासंगाला देखील पुरणार नाही. हे मला सुचायला हवं होतं...... मला का नाही सुचलं? (विजय विचार करतोय)

हा जन्माला येतांनाच कसली तरी अस्वस्थतेची गुटी पिऊन आलाय. आणि हा असा स्वछंद जीव मित्र असण्याच तरी आपलं नशीब आहे...
प्रत्येक वेळी हा मला असा माझाच विकृत चेहरा दाखवतो.
                 
               मला नेहमी कोडं पडतं, हे असं करायचं , हे मला का सुचत नाही? मी तर त्या बाईला ताट देऊ नको म्हणालो होतो.

(दादाने पुन्हा थालीपिठ आणून आम्हाला  दिलं.)

जानी दुश्मन : अरे विजय, खा आता....कसला विचार करतोयस.....

जानी दुश्मन : थालपीठ छान झालंय वहिणी.
येतो रे दादा....
विजय चल येतो रे मी.....भेटू सायंकाळी.... .
(असे म्हणून तो निघून जातो.)

दादा : काय घाईत असतो रे हा नेहमी?
विजय :  हं........

(फोनची रिंग वाजते. विजय खिशातून मोबाईल काढतो.)

विजय :  बोल बाळू......
अरे विचारलं मी त्याला......काही बोलला नाही तो........कुठे? नायगाव च्या झोपडपट्टीत......तिथल्या समाजमंदीरात मुक्कामाला होता....... तीन दिवस...... माझ्याकडून  जुने कपडे घेऊन गेला होता. सगळ्यांकडून  फ़राळ अन काहीबाही जमा केलं.............काय सांगतोस? कपडे फ़राळ अन स्वतःच्या पैशानं फ़टाके घेऊन तिथं मुलांसोबत दिवाळी साजरी केली.........

विजय : दादा  मागील तीन दिवसांचं कोडं सुटलं. हा माझा जानी दुश्मन तीन दिवसांपासून नायगावच्या झोपडपट्टीत लहाण मुलांसोबत दिवाळी साजरी करत होता....

दादा :  तुझा मित्र बाकी ग्रेट आहे यार!
विजय : मग मित्र कुणाचा आहे!

(हमको कलकी फिकर सताती....... हे गाणे चालू.... )



जानी दुश्मन - एकांकिका ( लेखक : रघुनाथदादा पाटील)

प्रवेश 2

(पार्श्वभूमीवर गाड्यांचे हॉर्नचे आणि कर्कश्श वाहतूकीचे आवाज
विजय:   तू मला सांगणार आहेस का, आपण कुठे चाललो म्हणून?
 जानी दुश्मन: तू बस रे, आत्ता पोहचूच आपण.
विजय :( हॉर्नचा आवाज ऐकून बाजूच्या गाडीवाल्याला) जा बाबा, तू पुढे जा.... ए जाउ दे रे .....त्याला पुढे जाउ दे...... )

वाहतूक पोलीस : ए चल.... जाउ दे रे.... ए आपे, अरे किती भरशील? काही नियम कायदा?
ए चल रे..... ए दुचाकी.....जाउ दे..... ए अरे थांब ना...काय चंद्रावर चाललास का?

(उजव्या विंगेतून विजय आणि जानी दुश्मन येतात.)
विजय: इथे या आकाशवाणी चौकात..... इथे कुठे जायचंय?
मॉलमध्ये जायचंय? काय घ्यायचं? ईथं काय चहा भेटत नाही का रे?
(विजयची बड-बड न ऎकता जानी दुश्मन वाहतूक पोलीसाच्या दिशेने निघाला.)

विजय: ईकडे कुठे चाललो आपण?

जानी दुश्मन :  ...........................

विजय:  अरे काही तं बोल.
 ( जानी दुश्मन वाहतूक पोलिसाजवळ पोहोचला. विजय मागोमाग.....
जानी दुश्मनने  थर्मॉसफ़्लास्कमधला चा कपात ओतला)

विजय:  च्यायला ह्याच्या..... मला वाटतं ह्याला कधीतरी सिग्नलवर पकडलं असावं, त्यांनी ह्याची गाडी तशीच; पैसे न घेता सोडली असेल. त्यामुळे...

जानी दुश्मन:  चहा घ्या ना काका.
(त्यांपोलीसाने चहा हातात घेतला परंतु त्यांची नजर आजु-बाजूला कसला तरी शोध घेत होती. नजरेत संशय दाटलेला.)

पोलीस : काय स्टिंग ऑपरेशन करत नाही ना? नायतर मायला आमची व्हायची गोची."

विजय: नाही हो काका, तसं काहीही नाही.

पोलीस: नाही हो, आजकाल कुणी स्वार्थाशिवाय चांगलं वागायला लागला की संशय यायला लागतो. सवयच नाही राहीली. त्यातल्या त्यात आम्ही पोलिसवाले. ( पोलीस जोरजोरात हसतो आणि विजयसमोर टाळीसाठी हात करतो.)

जानी दुश्मन : काका, तुम्ही छान काम करता....

विजय : मग काका, संध्याकाळपर्यंत किती खिसा भरतो? ( लोकांकडे पहात डोळा मिचकावतो आणि हसतो.)

वाहतूक पोलीस : अहो कसलं काय! अवघ्या चार दिवसात बदली होतेय माझी.....
पी. एम. गायकवाड ऐवजी बी. एम. गायकवाड अशी चूक झाली कम्प्युटरमध्ये..... बक्कल नंबर नसल्याने घोळ झाला आणि मी इथे आलो....
अशा व्यवस्थेत फीट नाही बसत आपण....

विजय : च्यायला सगळंच बिघडलंय....पार सडलीय व्यवस्था....

जानी दुश्मन : अशा व्यवस्थेतही तुम्ही प्रामाणीकपणाने काम करता, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे....

वाहतूक पोलीस : अरे पोरांनो..... मनात देवाची भिती असली की पाप करायचं धाडस होत नाही......

विजय : या आपेवाल्यांनी फार वैताग आणलाय....कुठेही थांबवतात, कसेही चालवतात....

वाहतूक पोलीस : अरे बाबा, त्यांचे पाठीराखे आहेत ना त्यांच्यासाठी! एखाद्याला दंड करायचा म्हटलं की लगेच नेत्याचस फोन येतो.

जानी दुश्मन: तुम्ही दिवसभर असे ईथे ऊभे असता ते जनतेसाठी. भलेही त्यासाठी पगार मिळत असेल; परंतु बारा-बारा तास सतत असं ऊभं रहायंचं; त्यातूनही सगळे पोलिसांवरच रोष व्यक्त करतात. नजरेत तिरस्कार. जसे सगळेच भ्रष्टाचारी आहेत! आमच्यासाठी तुम्ही एवढं करतात, आम्ही थोडीशीदेखील परतफ़ेड केली, तुमच्यावर देखील माणूस म्हणून प्रेम केलं, तुमची काळजी केली तर तुम्हालाही उभं रहायला देखील बळं येयील. समाजाला आपणही हवेसे आहोत ही भावनाच एखाद्याला बदलू शकते. आणि काका हा धन्यवाद म्हणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

(वाहातूक पोलीस सदगदीत झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं! डोळे टिपत)
वाहतूक पोलीस : अरे पोरांनो..... आजपर्यंत माझ्याशी एवढे प्रेमाणे कुणी बोलले नाही.... कधी पाठीवर कौतूकाची थाप नाही......
(डोळे  पुसत)
अरे आज काय रडवता का मला......

(त्यांनी जानी दुश्मनाला कडकडून मिठी मारली. भावनेनं ओथंबलेली गळा भेट पाहून विजय  सदगदीत झाला.)

विजय : (स्वगत)
  सालं फ़ेसबूकवरच्या रोजच्या शेकडो 'like' पेक्षा असं एखादं 'like'  जगण्यास नवी उर्मी मिळवून देतो.
हे खरं सोशल नेटवर्किंग! आपण देखील रोज असं एखादं 'like' क्लिक करावं.
    मन कसं काठोकाठ भरलेलं.
..................................
असं वाटतंय.......फ़ेसबूकवर जणू मलाच नागडं करून माझा फ़ोटो अपलोड केलेला अन सगळे त्याला ’like' करताहेत. किती खूजे आहोत ह्याच्यासमोर आपण! माझी मलाच विकॄत प्रतिमा वेळोवेळी दाखवतो. म्हणूनच मी ह्याला जानी दुश्मन म्हणतो.
     मला ह्याच्या मैत्रीचा अभिमान वाटतो; अगदी सार्थ अभिमान!

जानी दुश्मन - एकांकिका (लेखक : रघुनाथदादा पाटील)

प्रवेश 1

(दिवाणखाण्याची रचना. रंगमंचावर उजव्या बाजूला एक टेबल-खुर्ची. त्यावर लॅपटॉप/ टॅबलेट ठेवलेला. डाव्या बाजूला समोर एक टेबल ठेवलेला, त्यावर काही पुस्तके आणि वर्तमानपत्र ठेवलेले. मध्यभागी एक टी-पॉय, मागे सोफासेट किंवा खुर्च्या)

विजय : (लॅपटॉप/ टॅबलेट उघडतो. लॅपटॉप चालू करत.)
....................
चला फेसबूकवर बघू या. काय काय चाललंय या आभासी जगात.....
हो रे बाबा......लवकर चालू हो......

हां......
मित्रांच्या अपडेटसला 'like' करू. अं....like....अं...पुन्हा एक like काय... पिक्चर, अं तीन स्टार.... चारोळी....लय भारी..... इथे एक like.....like....like...like......like.....

सतीश दादा : काय, बसलास परत फेसबूकवर? या फेसबूकने वेड लावलंय तुला! जेंव्हा पहावं तेंव्हा फेसबूकवर.

विजय : अरे दादा, माझ्यासारख्या पुस्तके न वाचणा-या आणि कथा कवितांपासून दूर असणा-या लोकांसाठी हा छान पर्याय उपलब्ध आहे.
आता ही कविता ऐक..... किशोर कदमांची......

जगायास तेंव्हा खरा अर्थ होता,
निरर्थास ही अर्थ भेटायचे.....
मनासारखा अर्थ लागायचा अन,
मनासारखेही शब्द यायचे.....

दादा: हो, माहितीय मला. कवी सौमित्र!

असेही दिवस की उन्हाच्या झळांनी
जुने पावसाळे नवे व्हायचे.....
हृतूंना हृतूंनी जरा भागले की ,
नव्याने जुने झाड उगवायचे!

विजय: क्या बात ...... क्या बात.... क्या बात...
.......................................

विजय: (टाईप करत)
इथे छान! .....छान......छान.......
याला भन्नाट,
अं.......लय भारी ....

विजय: इथे  काय कमेंट करू? हे..... लय भारी.... ग्रेट.......
(असं type करत,  थोडासा आळस देउन)

तुला खरं सांगू का दादा,  मला देखील या  सगळ्याचा कंटाळा आलाय.

दादा: तरी तू फेसबूकवरच बसलेला.....

विजय: नाही रे, फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या की मी उठणारच आहे......
दोघातिघांचे वाढदिवस फ़ेसबूकने आठवण करून दिले, त्यांच्या वॉलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या की झाले.  त्याही कुठूनतरी कॉपी करून पेस्ट करूया.

दादा: त्यापेक्षा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना फोन करून शुभेच्छा दे की.
या व्हाटस अप ने आणि फेसबूकने प्रत्यक्ष संवाद पार संपवला.

विजय: दादा, अरे फोन करून शुभेच्छा दिल्या तरी मित्र मैत्रीणी म्हणतात, "वॉलवर शुभेच्छा दे म्हणून."

दादा: काय पण मित्र आहेत........ एकापेक्षा एक भारी......
अरे हो, ललीत आला नाही रे ......
तो एक वेगळाच प्राणी आहे. एकदम मस्तमौला....तुझ्या सगळ्या मित्रांत वेगळा आहे तो!

विजय : येयील एवढ्यात.....
              हां..... मुलगी.....   (मुलीचा सुंदर फोटो समोर आहे असे समजून चेह-यावर एक वेगळाच हुरूप)

इथे लिहू या............ ’वन अपॉन कॉस सी’ बरोबर सेक सी!

जर तिला  जॉमेट्रीतलं ट्रिग्नॉमेट्री माहीत असेल तर कळेल....

दादा: ए मला सांग ना...... ते वन अपॉन कॉस सी काय ते?

विजय: (दादाकडे पाहून जीभ दाताने दाबतो, गालातल्या गालात हसत)
अं.....अं......ते होय...... ते म्हणजे...... एस इ सी -- सी.

दादा: म्हणजे..... सेक्सी......
अरे काही लाजा धरा.....

विजय : (निर्लज्जासारखा हसतो; स्क्रीनकडे पहात..... थोडा वेळ शांततेत.... खालील ओळी वाचून दाखवतो.)

अरे दादा, हे ऐक ना.....
क्या खुब लिखा है किसी ने ...

"बक्श देता है 'खुदा' उनको, ... !
जिनकी 'किस्मत' ख़राब होती है ... !!

वो हरगिज नहीं 'बक्शे' जाते है, ... !
जिनकी 'नियत' खराब होती है... !

क्या करामात है 'कुदरत' की, ... !
'ज़िंदा इंसान' पानी में डूब जाता है और 'मुर्दा' तैर के दिखाता है ... !!

'मौत' को देखा तो नहीं, पर शायद 'वो' बहुत
"खूबसूरत" होगी, ... !
"कम्बख़त" जो भी 'उस' से मिलता है,
"जीना छोड़ देता है" ... !!

'ज़िन्दगी' में ना ज़ाने कौनसी बात"आख़री"होगी!
ना ज़ाने कौनसी रात "आख़री" होगी ।
मिलते, जुलते, बातें करते रहो यार एक दूसरे से ना जाने कौनसी "मुलाक़ात" "आख़री होगी"  !!

दादा: वाह....वाह.... क्या बात है, सुभानल्ला!!
(थोडा वेळ शांतता.....)
बरं, दिल्या का शुभेच्छा?

विजय : पण खरं सांगू का दादा,
 फ़ेसबूकमुळे जबरदस्तीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सारखं वाटतं.
(प्रेक्षकांकडे पहात, त्यांच्याशी बोलत)
खरंतर सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवणं अवघड आहे.  फ़ेसबूकमुळे ते सोपं झालं; पण साली सगळी मजाच निघून गेली.

दादा: का रे..... असं का वाटतं तुला?

विजय: पाच-पन्नास शुभेच्छा मध्ये आपली शुभेच्छा कुठेतरी एका कोप-यात पडल्यासारखी!
त्यावर ज्याचा वाढदिवस आहे त्याचं एकतर ’like' किंवा thanks. सालं सगळं वरवरंच वाटतं!

दादा: म्हणूनच म्हटलं..... प्रत्यक्ष फोन करून शुभेच्छा दे!

विजय: हं.... बरोबर आहे तुझं! फेसबूकवर सगळंच कसं खोटं वाटायला लागलं.
काही ग्रूपही जॉईन केलेले. ग्रूपवर कार्यरत असलेली मंडळी काहीतरी लिहिणं बंधनकारक असल्यासारखी सारखी काहीतरी लिहीत असतात, अगदी भाकरी थापल्यासारखी! चुटकीसरशी साहित्य निर्मीती करणारी. मग ते काहीही असो. अन बाकी सगळे त्याला ’like' करतात. सगळाच आव आणलेला!

मग ज्याने लिहीलं ही त्याची जबाबदारी ठरते की त्याने परतफ़ेड करावी. दिवाकरांनी एका नाट्यछटेत लिहील्याप्रमाणे. तुम्ही मला चांगले म्हणा, मी तुम्हाला चांगले म्हणेन! माहीत नाही किती मनापासून असतं आणि किती संकेत पाळण्यासाठी? (पुन्हा संगणकासमोर बसत)

दादा : अरे, आभासी जग आहे हे.... इथं असंच चालतं.....

विजय : सगळेच काहीबाही लिहीतात असं नाही, काही मंडळी छान लिहीतात, परंतु त्यांचं ही लिखान असंच यात कुठेतरी हरवलेलं.  
गंमत म्हणजे ......राजे......मुलींच्या अगदी पाचकळ फ़ुटाण्यांना टीन-एजरपासून वयस्कांपर्यंत सगळ्यांचेच 'like' आणि कमेंटस मिळत असतात.
               मला बुवा आजकाल सोशल नेटवर्किंगचा कंटाळा येतोय.

(तेवढ्यात ललीत अर्थात जानी-दुश्मन येतो. सरळ विजय जवळ येउन उभा राहतो.)

जानी दुश्मन : काय विजय, फेसबूक का! काय विशेष?
( विजयच्या पाठीवर थाप मारून काही बोलायचे तर..... लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पहात)
अरे अरे वरती घे.....परत वरती घे....(हसून) काय भारी कमेंटस हेत......
बरं ए विजय, चल ना.....
        "चल ना लवकर तयार हो, आपल्याला जरा जाऊन यायचंय."

जानी दुश्मन: मग काय दादा, काय म्हणतोस?
दादा: काही नाही रे, काही विशेष नाही, आजच्या घडामोडी वाचतोय.

(हा लगेच जाणार हे ऐकून वहिणी आतूनच बोलतात)

वहिणी : भावजी, चहा टाकलाय.....

 विजय :  तुम्हाला सांगतो कुठे, काय हे विचारायच्या भानगडीत न पडता मी सरळ कम्प्यूटर शट-डाऊन करतो.....(उठून उभा राहत) चला मी कपडे बदलतो....

दादा : काय रे.... कुठे जायचंय? काही पार्टी बिर्टी तर नाही ना?

जानी दुश्मन : नाही रे दादा.... तसं काही नाही.
(तोपर्यंत वहिणीने चहा बनवला.)
वहिणी : (,आतूनच दादाला आवाज देतात.) अहो....

(दादा उठून आत जातो.)

विजय : अरे वा! कॉलेज कादंबरी..... छान आहे.... वाचलीय मी ......(तिचे पानं चाळतो.)

जानी दुश्मन : वहिणी आज मला चहा ईथे घरी नकोय, थर्मॉस्फ़्लास्कमध्ये भरून द्या.
(कपडे बदलून विजय बटनं लावीत बाहेर आला. आणि दोघे सोबत निघाले.)
दादा: हे घे रे.... सावकाश जा, आणि लवकर या.
---------------------------------
रंगमंचावर काळोख.... blackout.
पार्श्वभूमीवर वाहतूकीचा आवाज.
 ---------------------------------             

for more details : visit facebook page