२२ नोव्हेंबर, २०११

माझं गाव

Add caption


माझं गाव तसं शहराजवळ. गावं टूमदार असतात असं फ़क्त पुस्तकात वाचायचंच. स्वातंत्र्यानंतर लोकशाही राज्ये ही संकल्पना राबविली असली तरी ती फ़क्त संकल्पनाच आहे. बकाल खेडी म्हणावी अशीच गावं मला सभोवती दिसतात. पांढ-या मातीची, पत्र्याची वेडी-वाकडी घरे, ओबडधोबड स्वरूपात सडा टाकल्याप्रमाणे ; जिथे पडेल तिथे ऊगवले. असे घरांचे स्वरूप वेड्यावाकड्या गल्ल्या. गावभरातल्या सगळ्या गल्ल्यांतून-रस्त्यातून मधोमध सांडपाण्याची गटारं वाहतांना दिसतात. एखाद्या बड्या घरासमोरून साबनाच फ़ेस दिसायचा आता तो सगळ्या घरासमोर दिसतो. जागतिकीकरणाने सगळं जग मार्केट च्या स्वरूपात जवळ आलं. नुसतं जवळ आलं नाही तर पार खेड्यापाड्यातल्या गल्ल्याबोळात शिरलं. सुगंधी साबनापासून ते अंतर्वस्त्रापर्यंत सगळं उपलब्ध झालंय. खेड्यातही सगळ्यांच्या तोंडात सगळे ब्रांड नावं टीव्ही नं कोंबलेत. नावांच्या बदल्यात दर महिण्याला खिसाअ मोकळा झाला ह्ये  फ़ारसं आमच्या लक्षातच नाही आलं. आधी साबनं वापरायची अन मागून त्वचा कोरडी पडली म्हणून क्रिम वापरायचे.
                      सगळ्या ग्रामजीवनावर प्रभाव पडला. घरासमोरच्या काळ्या गटारी जाऊन सुगंधी गटारी निर्माण झाल्या. बाकी सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी मागील पन्नासपेक्षा अधीक वर्षापासून काहीही फ़रक पडला नाही. ग्रामस्वातंत्र्याची किंवा ग्रामप्रशानाची ओळख म्हणजे ग्रामपंचायत असूनही गावाच्या व्यवस्थेत काही फ़रक पडलेला नाही, हे विदारक आणि आपल्या लोकशाहीवर कोरडे ओढणारे सत्य ओरडून सांगणारे फ़ाटके- तूटके रस्ते, खरकट्या ओलसर गल्ल्या अजुनच मळकट झाल्यात.
                     शासनाने शौचालये बांधून दिली परंतु त्यात कुठे भांडेच बसवलेले नाही. मग त्यात पाट टाकून कुठे त्याचा उपयोग न्हाणीघर म्हणून अर कुठे गोव-या किंवा तत्सम जळतन साठवायला; नाहीतर अडगळीची जागा म्हणून उपयोग होतोय. या सगळ्या शौचालयांतून सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्थाच केली नसल्याने हे सगळं पाणी गल्लीत-रस्त्यावर.
     गावात सगळ्या एकसारख्या घरांमध्ये पुरळ उठल्यासारखी काही नवीन सिमेंटची घरे. ज्यात आतून बाहेरून प्लास्टर न केलेले किंवा एखादं चुकलेलं जनावर कळपात मिसळावं असं एखादं रंगीबेरंगी घर!

गाव सिडकोच्या झालरक्षेत्र विकास आराखड्यात आल्याने अचानक जमिनीचे भाव नुसते आकाशाला भिडले नाहीत तरआकाश फ़ाडून अल्पभूधारकांना आकाश ठेंगणं करणारे ठरले. कोट्यावधी रुपये भाव आल्याने सत्तधिशांपासून ते बाबूंपर्यंत सगळ्यांनी जमीनी विकत घेण्याचा सपाटा लावला.  परिणामी सगळ्याच घरासमोर फ़ाटक्या रस्त्यावर - गल्लीबोळात मोठ-मोठ्या एसयुव्ही ऊभ्या राहिलेल्या दिसताहेत. गावाजवळून जाणा-या जळगाव रोडवर बीअर-बार ची संख्या वाढली, पत्त्यांचे क्लब सुरू झाले.
                गावाशेजारी रस्त्याच्या दुतर्फ़ा सिमेंटचं जंगल उभं राहीलं. गावतली मिसरूडंदेखील न फ़ुटलेली मुलं ढाब्यावर, बीअरबार आणि पत्त्यांच्या क्लबवर मोठ्या थाटात वावरतांना दिसताहेत. जुनी जाणती मंडळी मंदिराजवळ डोक्याला हात लावून एकटक कुठेतरी पाहतांना, हरवलेल्या, विमनस्क अवस्थेत दिसतेय. त्यांचं ऎकून घ्यायला देखील कुणाकडे वेळ नाही.सगळा कारभार मुलांनी हाता घेतलाय.
        घरटी आता किमान एकतरी दुचाकी आहेच सोबत मोठमोठ्या एसयुव्ही. एसटी महामंडळाची सिटीबस कधीच बंद झाली. नाहीतरी रिकामी बस फ़िरवायला मंडळ काही पुर्वीसारखं मुजोर राहीलं नाही. शहर आणि गावं जोडणारी लालभडक बस त्यावर पांढरे पट्टे पाहून बंद दरवाजा नसलेली सिटीबस आता कुणाला आवडायचं कारण राहीलं नाही.
       गावाभोवतालची जमीन येल्लो झोन मध्ये गेल्याने  सगळीकडे प्लॉटस विक्रीचे फ़लक नजरेला पडताहेत. जिथे पुर्वी मोसंबीचे मळे , फ़ळांच्या बागा, मेहंदीमळा, केळीची पट्टी, गव्हाची शेतं, माळवं असं दिसायचं तिथं आज सगळीकडे पांढ-या रेघोट्या ओढलेल्या अन दगडं रोवलेली दिसताहेत.
              नावंच कुरूप असणा-या सिडकोनं दोन ऒळीचा आदेश काढून आदेशातल्या ऒळी आमच्या गावावर पांढ-या रंगानं फ़िरवल्यात. कित्येक अल्पभुधारक शेतकरी आपल्या जमीनी सिडको घेणार या धास्तीने जमीनी विकून मोकळे झाले. कवडीमोलानं जमीनी विकत घेण्याचं षडयंत्र रचू जाणीवपुर्वक आधी वर्षभर मोघम अधीसुचना काढली.  त्यात नंतर बदल केले गेले. वाटेल तसं ओरबाडायचे मार्ग माहीत असणा-या यंत्रणेने आमच्या गावाच्या नशीबी दगडगोटे लिहीले. 
     एखाद्याच्या डोक्यावरची सगळी केसं झडून कोरंकरकरीत टक्कल दिसावं अन त्यातून डोक्यात खवडे व्हावेत, अशी अवस्था माझ्या गावाची झाली आहे. सगळीकडे प्लॉटस, अधूनमधून बांधकाम सुरू. दगडविटांचा खच पडलेला. सगळे अनोळखी चेहरे ऊगवलेले. कुठेच शेतीकाम करणारं कुणी दिसत नाही. कालपर्यंत एखादा एकर जमीन असणारा कामगार वर्ग दुस-याच्या शेतावर काम करतांना दिसायचा, शेतात पोटापुरतं पिकवायचा. अडीनडीला रोजंदारीनं जायचा. परंतु आज तो देखील हातात पैसा आल्यानं काहीसा बेबंद झाला आहे. सग्ळं चित्रच बदललंय.
         बरं हा पैसा हातात आला अन सगळंच बिघडलं.  बीअर्बार पासून ते पत्त्यांच्या क्लबवरची गर्दी वाढली. हरीनाम सप्ताह कधीच बंद झाला. एखाद्या ठिकाणी असेल तर तिथंही मोठमोठी होर्डींग्ज. आमदारापासून ते पार गल्लीतल्या चोरापर्यंत सगळ्यांचीच चित्र! अशा विचित्र अवस्थेत हरीनाम सप्ताह हा इव्हेंट झाला. सगळीकडे नेत्यांची भाषणं, त्यांचे फ़ोटो, त्यांचे सत्कार अन सरतेशेवटी फोटो काढून झाले की बाहेरून पैसे देऊन बोलावलेले किर्तनकार किर्तन करणार.
     धार्मीक कार्यक्रमांना गर्दी तशी भरपूर परंतु ’देव देवळात अन चित् खेटरात’ अशी अवस्था. सगळं असूनही माणूस कुठेच रमत नाही. खिशात पैसा खुळखुळायला लागला की रस्त्यावरचे बीअरबर खुणावतात. सगळीकडे नेत्यांचं पिक आलंय. खादी महाग झाली तरीही पांढ-या कपड्यावाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय.

रघुनाथदादा पाटील

२ टिप्पण्या:

for more details : visit facebook page