२८ ऑक्टोबर, २०११

जानी दुश्मन - भाग दोन

ऎन सनासुदीचे तीन दिवस बेपत्ता झालेला जानी दुश्मन आज अचानक अवतरला.
"वहिणी, मला खूप भूक लागली, काही खायला द्या ना."  तो वहिणीला म्हणाला.
"भावजी फ़क्त दोन मिनीट हं." वहिणी म्हणाली.
"वहिणी मॅगी करताहेत का, ’बस दो मिनीट’." मी हसत म्हणालो.
"आत्ता करते कांद्याचं थलिपीठ."
वहिणी काही करत बसू नका, जे असेल ते द्या. फ़रसान, चिवडा काहीही चालेल." तो म्हणाला.
"कुठे होतास तीन दिवस?" मी विचारलं.
"ईथंच होतो रे."
"मग लक्ष्मीपुजनाला का नाही आलास? गावाकडे गेलतास का?"
"नाही रे इथंच होतो, जरा कामात होतो."
त्यानं पेपर हातात घेतला, अन बातम्या चाळू लागला.
                   बाहेर ताशा वाजवण्याचा आवाज येऊ लागला. काय वाजतय हे पाहण्यासाठी आम्ही दोघं दरवाज्यात जाउन ऊभं राहीलो. एक रंगानं काळी-सावळी.... कसली काळी-सावळी एकदम काळीकुळीत बाई..एका लहाणग्याला कुशीत घेऊन ताशा वाजवत होती. फ़ाटकी साडी, केसांच्या झिंज्या कडेवरील मुल एकदम कुपोषीत..हात पाय बारीक झालेले... सोबत एक सात आठ वर्षाचा मुलगा. खाली फ़्रॉक, वरती ऊघडाबंब. कपाळावर गंध लावलेला, गळ्याला, कानाला, गालावर रंग फ़ासलेला. हातात एक सोट घेउन स्वतःला मारतोय. कडाड-कडाड आवाज करत स्वतःला सोट मारतोय. बाई वाजवतीय.. केवीलवाणा चेहरा करून, काही दानधर्म करा, पाच रुपये द्या ना दादा; अशी विनवणी करतेय..
तिचा असला अवतार पाहून तिची दया येण्याऎवजी मला तिची किळस वाटली. तोपर्यंत वहिणी अन दादा दरात येऊन आमच्या पाठीशी ऊभे. ही बाई सरळ घरात घुसते की काय म्हणून वहिणी थोड्या घाबरल्या, अन आत गेल्या.
"तुम्ही आत या अन दरवाजा लोटून घ्या."वहिणी असं दादाला म्हणाल्या.
"चला रे आत चला." दादा म्हणाला.
"जाऊ दे यार, ह्यांना कामधंदा करायला नको, नुसतं आयतं बसून खायला हवं." मी म्हणालो.
तो आत आला, मी दरवाजा लावून घेतला.
                  तो छोटा मुलगा कडाकड अंगावर सोट ऊठवतोय. त्याची आई ताशा वाजवतीय..काकुळतीला येऊन विनवणी करतीय...एकदम लाचार...मी अजुनही खिडकीतून पाहतोय, मला तिच्या वाजवण्याचा त्रास होतोय.तो मुलगा आता समोरच्या घराकडे निघाला. त्यांनी ह्याला येतांना पाहून दरवाजा लावला.
बाईचा आवाज आता कर्कश्श...."वाढ ओ माय....गरीबाला दान दे... भीक दे...तुहे पोरं सुखात राहतील."
टीव्ही वर मराठवाड्यातील कुपोषनावर एक माहीतीपट चालू... मला ती कुपोषीत मुलं पाहून त्यांची कणव आली.
"सालं सरकार, काही उपाययोजना करतं की नाही."
"............................." जानी दुश्मन शांत.
"लोकांनी तरी अशा लोकांना खायला द्यावं यार." मी म्हणालो.
वहिणींनी तोपर्यंत कांद्याचं थालपीठ आणलं. आमच्या दोघांच्या हातात दोन प्लेट दिल्या.
वहिणी छान थालपीठ करते.
जानी दुश्मन ने एक घास खाल्ला. दुसरा तुकडा मोडला, अन काहीतरी स्वगत बोलत प्लेट घेऊन ऊठला.
"काय म्हणालास?" मी  विचारलं.
हा दरवाजा ऊघडून अंगणात. त्या बाईला आवाज दिला. तिला कंपाऊंड मध्ये बोलाऊन बसायला सांगितलं. अन हातातली प्लेट तिच्यासमोर केली.
"अरे, हे काय रे? रात्रीचं आहे ते देऊ ना आपण तिला."
"................................."
"वहिणी रात्रीची पोळी-भाजी आणा बरं." मी म्हणालो.
"ती राहू दे, ती मी खातो." जानी दुश्मन म्हणाला.
"अरे साजूक तुप लावलेलं थालपीठ होतं."
                  मला थोडं वेगळंच वाटलं. सालं रात्रीचं दिलं असतं ना तिला. तोपर्यंत ती बाई अन तो मुलगा थालपीठ बकाबका खात होते. खूप भुकेले होते बहुदा. त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहत जानी दुश्मन कुठेतरी हरवलेला.  त्यांच्या पोटात अन्न गेल्याने ते सुखावले. चेह-यावरची तृप्ती पाहून मलादेखील बरं वाटलं. वहिणींनी आणखी थालपीठ वाढलं.
आत्ता दोन मिनीटापुर्वी मी कुपोषीत मुलं पाहूण वांझोटी सहानुभूती दाखवत होतो. प्रत्यक्ष कृती मात्र शुन्य. एखाद्या न्युज चॅनलवर जशी चर्चा करून आपण फ़ार मोठं समाजकार्य करतोय, अन आपल्याला कुणालाही कसलेही प्रश्न विचारायची मुभा आहे असं समजणा-या संपादकांसारखी माझी अवस्था आहे. प्रत्येक ईश्यु कॅश करणे एवढाच हेतू असण्यासारखं होतं ते.
                   सालं आपण समाजसेवा करायची म्हणतो ते पण शिळं पाकं, फ़ेकायचं अन्न असं खायला देऊन. तेच अन्न स्वतः खाऊन हातातलं ताट असं देण्यासाठी फ़क्त जानी दुश्मनच हवा. आपला तो पिंड नाही.आपण शिळंपाकं अन्न देऊन पुण्य कमावल्याच्या भ्रमात वावरतो.
           तांब्या भर पाणी पिऊन ती बाई अन तो मुलगा तृप्त झाले. त्या लहाणग्याला अन मुलाला असं पाहून वहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी डोळ्याच्या कडा टिपल्या. माझी मलाच लाज वाटली. आपण ह्याच्या पासंगाला देखील पुरणार नाही. हे मला सुचायला हवं होतं मला का नाही सुचलं? मी विचार करू लागलो, हा जन्माला येतांनाच कसली तरी अस्वस्थतेची गुटी पिऊन आलाय. आणि हा असा स्वछंद जीव मित्र असण्याच तरी आपलं नशीब आहे...
प्रत्येक वेळी हा मला असा माझाच विकृत चेहरा दाखवतो. मी विचार करू लागलो.
                  आपण स्वतः मंदीरात साधी ऊदबत्ती लावायला जात नाही, अन वर्गणी देऊन पुण्य केल्याच्या भ्रमात वावरतो. मुळात वर्गणी जमा करायची लाजीरवाणी वेळ आली याबद्दल काहीही वाटत नाही, त्याचीही समर्थनं तयार आहेत आमच्याजवळ. म्हणूनच मंदीरात दिवा, धूप , अगरबत्तीसाठी घरटी पाचशे रुपये वर्गणी जमा करायची वेळ आली. गावोगाव एवढी मंदीरं आहेत...कुठेही वर्गणी नाही. वर्गणी देणा-यांना वाटतं आपण धर्माचं काम करतोय अन वर्गणीच्या नावाखाली हजारो रुपये जमा करणा-यांना पैसा खाण्याचा एक नवा मार्ग मिळाला.
               मला नेहमी कोडं पडतं, हे असं करायचं , हे मला का सुचत नाही? मी तर त्या बाईला ताट देऊ नको म्हणालो होतो.
वहिणीने पुन्हा थालीपिठ आणून दिलं. जानी दुश्मन नं ते संपवलं.थालपीठ छान झाल्याची पावती देऊन, सायंकाळी परत येतो म्हणून तो अंतर्धान पावला.
"काय घाईत असतो रे हा नेहमी?" दादा मला म्हणाला.
"हं........" मी.

         दुपारी बाळूचा फोन आला त्यानं सांगितलं की, जानी दुश्मन मागील तीन दिवस नायगावच्या झोपडपट्टीत असलेल्या समाजमंदीरात मुक्कामाला होता. माझ्याकडून विजयचे जुणे कपडे घेऊन गेला होता. सगळ्या मित्रांकडून फ़राळ अन काहीबाही जमा केलं, कपडे , फ़राळ अन स्वतःच्या पैशानं फ़टाके घेऊन तिथं मुलांसोबत दिवाळी साजरी केली.
            मागी तीन दिवसांचं कोडं सुटलं होतं. मी वहिणीला सांगितलं. दादा देखील होता समोर.
"तुझा मित्र बाकी ग्रेट आहे यार!" दादा म्हणाला.
मला खूप छान वाटलं.
"वहिणी म्हणाली,"लग्न झाल्यावर काय होईल ते होवो."



माझी एक कथा
रघुनाथदादा पाटील



२० ऑक्टोबर, २०११

माझा जानी दुश्मन- भाग एक


मी फ़ेसबूकवर अपडेटस चेक करत होतो. मित्रांच्या अपडेटसला 'like' करत. असे पंचविस-तीस ’like' दहा-वीस छान असे कमेंटस आणि भन्नाट, लय भारी यासोबतच ग्रेट असे टाईप करत बसलेलो. खरंतर ह्या सगळ्याचा देखील कंटाळा आलाय. दोघातिघांचे वाढदिवस फ़ेसबूकने आठवन करून दिले, त्यांच्या वॉलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या; त्याही कुठूनतरी कॉपी करून पेस्ट करायच्या.
                मुलीचा सुंदर फोटो असला की ’वन अपॉन कॉस सी’ असं टंकायचं. जॉमेट्रीतलं ट्रिग्नॉमेट्री ज्यांना माहीत आहे त्यांना हे कळायचं.
               फ़ेसबूकमुळे जबरदस्तीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सारखं वाटतं. खरंतर सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवणं अवघड आहे परंतु फ़ेसबूकमुळे ते जरा सोपं झालं; पण साली सगळी मजाच निघून गेली. पाच-पन्नास शुभेच्छा मध्ये आपली शुभेच्छा कुठेतरी एका कोप-यात पडल्यासारखी! त्यावर ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्यानं एकतर ’like' किंवा thanks टंकावं. सालं सगळं कसं ड्युटी असल्यासारख.
              काही ग्रूप जॉईन केलेले. ग्रूपवर कार्यरत असलेली मंडळी काहीतरी लिहिणं बंधनकारक असल्यासारखी सारखी काहीतरी लिहीत असतात, अगदी भाकरी थापल्यासारख्री! चुटकीसारखी साहित्य निर्मीती करणारी. मग ते काहीही असो. अन बाकी सगळे त्याला ’like' करतात. सगळाच आव आणलेला! मग ज्याने लिहीलं ही त्याची जबाबदारी ठरते की त्याने परतफ़ेड करावी. दिवाकरांनी एका नाट्यछटेत लिहील्याप्रमाणे. तुम्ही मला चांगले म्हणा, मी तुम्हाला चांगले म्हणेन! माहीत नाही किती मनापासून असतं आणि किती संकेत पाळण्यासाठी?
सगळेच काहीबाही लिहीतात असं नाही, काही मंडळी छान लिहीतात, परंतु त्यांचं ही लिखान असंच यात कुठेतरी हरवलेलं.  मुलींच्या अगदी पाचकळ फ़ुटाण्यांना टीन-एजरपासून वयस्कांपर्यंत सगळ्यांचेच 'like' आणि कमेंटस मिळत असतात.
               मला आजकाल सोशल नेटवर्किंगचा कंटाळा येतोय. तेवढ्यात माझा जानी-दुश्मन आला. अगदी घाईतच. नेहमीप्रमाणे!
  "चल ना लवकर तयार हो, आपल्याला जरा जाऊन यायचंय." तो म्हणाला.
 कुठे, काय हे विचारायच्या भानगडीत न पडता मी कम्प्यूटर शट-डाऊन केला आणि कपडे बदलून तयार झालो. तोपर्यंत वहिणीने चहा बनवला. आज ह्याला चहा ईथे घरी नव्हता घ्यायचा, थर्मॉस्फ़्लास्कमध्ये भरून घेतला, आणि आम्ही त्याच्या पल्सरवर निघालो.
                 "तू मला सांगणार आहेस का, आपण कुठे चाललो म्हणून?" मी म्हणालो.
                "तू बस रे, आत्ता पोहचूच आपण."
सरळ आम्ही आकाशवाणी चौकात सिग्नलवर एका बाजूला बिग बाजार समोरच्या पार्किंगकडे वळलो.
            "बिग बाजार मध्ये जायचंय? काय घ्यायचं? ईथं काय चहा भेटत नाही का रे?"
   माझी बड-बड न ऎकता त्यानं गाडी पार्कींगमधे लावली. अन सिग्नल कडे निघाला.
       "ईकडे कुठे चाललो आपण?"
       " ..........................."
       " अरे काही तं बोल."
 तरीही तो डावी-ऊजवीकडे पहून रस्ता ओलांडून वाहतूक पोलिसाजवळ पोहोचला. मीही रस्ता ओलांडला.
त्यानं थर्मॉसफ़्लास्कमधला चा कपात ओतला आणि त्या वाहतूक पोलिसाला दिला.
   मी एकदम अवाक!
  तो पोलिसही थोडा गोंधळला. तो आमच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहू लागला.
मला थोडं वेगळंच वाटलं. वाटलं ह्याला कधीतरी सिग्नलवर पकडलं असावं, त्यांनी ह्याची गाडी तशीच पैसे न घेता सोडली असेल. त्यामुळे...
""चहा घ्या ना काका." जानी-दुश्मन म्हणाला.
त्यांनी चहा हातात घेतला परंतु त्यांची नजर आजु-बाजूला कसला तरी शोध घेत होती. नजरेत संशय दाटलेला.
"काय स्टिंग ऑपरेशन करत नाही ना? नायतर मायला आमची व्हायची गोची."
"नाही हो काका, तसं काहीही नाही." मी म्हणालो.
" नाही हो, आजकाल कुणी स्वार्थाशिवाय चांगलं वागायला लागला की संशय यायला लागतो. सवयच नाही राहीली. त्यातल्या त्यात आम्ही पोलिसवाले."
"तुम्ही दिवसभर असे ईथे ऊभे असता ते जनतेसाठी. भलेही त्यासाठी पगार मिळत असेल; परंतु बारा-बारा तास सतत असं ऊभं रहायंचं; त्यातूनही सगळे पोलिसांवरच रोष व्यक्त करतात. नजरेत तिरस्कार. जसे सगळेच भ्रष्टाचारी आहेत! आमच्यासाठी तुम्ही एवढं करतात, आम्ही थोडीशीदेखील परतफ़ेड केली, तुमच्यावर देखील माणूस म्हणून प्रेम केलं, तुमची काळजी केली तर तुम्हालाही उभं रहायला देखील बळं येयील. समाजाला आपणही हवेसे आहोत ही भावनाच एखाद्याला बदलू शकते. आणि हा धन्यवाद म्हणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.
वाहातूक पोलिसानं चहा घेतला. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं! त्यांनी माझ्या जानी दुश्मनाला कडकडून मिठी मारली. भावनेनं ओथंबलेली गळा भेट पाहून मी अगदी सदगदीत झालो.
  सालं फ़ेसबूकवरच्या रोजच्या शेकडो 'like' पेक्षा असं एखादं 'like'  जगण्यास नवी उर्मी मिळवून देतो.
हे खरं सोशल नेटवर्किंग! आपण देखील रोज असं एखादं 'like' क्लिक करावं असं वाटलं.
     माझं मन कसं काठोकाठ भरलेलं. फ़ेसबूकवर जणू मलाच नागडं करून माझा फ़ोटो अपलोड केलेला अन सगळे त्याला ’like' करताहेत. किती खूजे आहोत ह्याच्यासमोर आपण! माझी मलाच विकॄत प्रतिमा वेळोवेळी दाखवतो. म्हणूनच मी ह्याला जानी दुश्मन म्हणतो.
     मला ह्याच्या मैत्रीचा अभिमान वाटतो; अगदी सार्थ अभिमान!
त्या वाहतूक पोलिसाला तसाच भावनाविवश अवस्थेत सोडून आम्ही लगेच परत निघालो.
क्रमशः

माझी एक कथा
रघुनाथदादा पाटील

 

             

for more details : visit facebook page