शाळा नेहमीप्रमाणे सुरु होती. यावर्षी नव्यानच शाळेत आलेल्या कुंभार गुरुजींची मुलगी आमच्या शाळेत होती. कुंभार गुरुजी यापूर्वी जिल्ह्याच्या शाळेत म्हणजे औरंगाबादला होते. गुरुजी गणित फार छान शिकवायचे. कुंभार गुरुजींची मुलगी दहावीला होती. दिसायला एकदम कंडा होती, पांढ-या पोलक्यात अन् निळ्या स्कर्टमध्ये ती अजूनच छान दिसायची. घट्ट कपडे वापरायची. केस कापलेले. छान मेकअप करायची. लेटेस्ट वेशभूषा असलेले कपडे वापरायची. ज्यादिवशी यूनिफॉर्मला सुट्टी असेल त्यादिवशी चांगलीच वेशभूषा करायची. शाळेतली बरीच मुले तिच्यावर लाईन मारायची.
कुंभार गुरुजी गावातच राहायचे. गावातल्या तेल्याच्या वाड्यात राहायचे. कुंभार बाईदेखील दिसायला छान होत्या. गणिताच्या अडचणी सोडावयला आम्ही कधी कधी त्यांच्या घरी जात असू. त्यांचा छोटा मुलगा जो शहराच्या इंग्रजी शाळेत होता तो अन् ही मुलगी सरिता. गुरुजींच्या मुलाचं नाव संदिप. तिसरी म्हणजे थर्ड स्टँडर्डला होता.
सरिता माझ्याशी छान बोलायची. कुंभार गुरुजींचा माझ्यावर विशेष जीव! मी गणितात हुशार होतो म्हणून गुरुजी मला नेहमी समोर बसवायचे. सगळी कामं मलाच सांगायचे. मी वर्गात जवळजवळ मॉनीटरच झालो होतो. फक्त गुरुजींच्या तासापूरता. वर्गातली आणि शाळेतली मुलं मला चिडवायची. सरिताला चिठ्ठी देदतो का म्हणून गळ घालायची. मी नाही म्हंटलो की मला चिडवायचे. सरिता माझी बहिण आहे असं म्हणायचे. मला खूप राग यायचा. परंतु गुरुजींनाच काय कुणालाही सांगायचं धाडस मात्र होत नव्हतं.
अकराच्या लघुमध्यंतरात आम्ही बस अड्ड्यावर कडूबा चेअरमनच्या विहीरीवर जायचो. पाइपला हात लाऊन पाणी प्यायचो. रामदास, शिवा, सतीश भेटायचो. तेही शाळेत असल्यापासून सोबत असायचो. रामदास आणि गण्या सतत भांडायचे.
’’पहेलवान का भेजा, घुटने मे होता है’’ गण्या म्हणाला आणि पळून गेला. रामदासही तसाच त्याच्यामागे धावला. दोघेही धावत सुसाट शाळेकडे गण्याला पक्क माहित आहे, की आपण फक्त सरांसमोर असलो तरच वाचू शकतो. तो धावतच मुख्याध्यापकांच्या कक्षासमोर जाऊन उभा राहिला. रामदास धावत त्याच्यामागे गेला, परंतु थोडा अलीकडेच थांबला. गण्या इकडे येण्याची वाट पहात थांबला. आम्ही पाणी पिऊन परत आलो. गारेगारवाला बाहेर ओरडत होता. आम्ही परत रामदासला घेऊन बाहेर गेलो.
’’ए रामदास, जाऊ दे ना यार, एकदाच सोड ना, मी आता असं नाही म्हणणार! मी तुला म्हणालोच नव्हतो. तू उगीच अंगावर येतो यार’’. गण्या म्हणाला.
गण्यालाही आमच्यासोबत यायचं होतं. आमच्यात मिसळून गप्पा मारायच्या होत्या. परंतु त्याच्या मस्करी करण्या च्या स्वभावामूळे तो सतत असा मार खायचा. तरी सुधारायचं नाव नाही. मी रामदासला समजावलं. तो म्हणाला, ’’ठिक आहे, ये, मी काही म्हणणार नाही’’.
गण्या घाबरतघाबरत जवळ आला तसा रामदासने त्याची मानगूट पकडली. हात पिरगाळला आणि पाठीत रट्टा घातला. गण्या कळवळला. पुन्हा काही म्हणणार नाही असं वारंवार सांगत होता. रामदासने सोडला. गण्या कळवळत खाली बसला. थोडा शांत झाला. काहीतरी विचार चालूच असावा. रामदास साठी काहीतरी नवीन चीड शोधून काढणारच तो.