०७ सप्टेंबर, २०११

हे सगळे म्हातारे हापशावर येणा-या बायकांना अन मुलींना सारखे न्याहाळून





सगळ्या खेड्यांप्रमाने आमच्या गावातही देऊळांची कमतरता नाही. बस अड्ड्यावर गोसावी लोकांनी बांधलेलं काली मातेचं मंदीर. ईथं सतत वर्दळ असते. सगळीच घरं लहान असल्याने गावातल्या पारावर असणा-या गर्दीसारखी गर्दी! बस अड्ड्यावर येता जाता इथं थांबा घेऊनच पुढे जाणारी मंडळी., काही वयस्कर मंडळी , मंदीरासमोर लहान मुलांचा खेळ चालू; अशी सतत गजबजलेली जागा. अगरबत्तीच्या सुगंधाने परिसर  दरवळलेला! मनोभावे हात जोडतांना इथल्या बायका  काय मागत असतील? असा प्रश्न मला पडायचा. बहुदा म्हशींसाठी मुबलक चारा/गवत मिळू दे अशी प्रार्थना करत असाव्यात.
                          बस अड्ड्यावरून गावात न जाता सरळ वाडीकडे जातांना  शाळेच्या अग्नियेला नदीकाठावर लक्ष्मीआईचं छोटसं विटांचं मंदीर. ईथूनच गाव पौषातल्या अमावस्येला बाहेर पडायचा. पोळ्याला बैलं इथं दर्शनाला आणली जायची. बैलाचा खांदा दाबून पुढच्या दोन पायांवर; पाय दुमडून बसायला लावणारा सखाराम मला एखाद्या सुपरहिरोसारखा वाटायचा.
          मंदीरासमोर छोटे-छोटे पाळणे, हिरवा चुडा आणि चोळीचा खण देवीला अर्पण केलेला असायचा. मुस्लीम कब्रस्थानला लागून असलेलं हे मंदीर थोडं आडवळणालाच आहे.
                 गावात प्रवेश करतांना डाव्या हाताला बजरंगबली मारूतीचं मंदीर. ग्रामदैवत असलेल्या मारूतीचं हे मंदीर खरंच खूप छान आहे! मला खूप आवडतं! कसं प्रसन्न वाटतं इथं!
             आम्ही गोट्या खेळून थकलो की इथंच मंदीरासमोर्च्या हापशावर पाणी प्यायचं आणी इथंच येऊन निवांत बसायचं. ऊन्हाळ्यात ही फ़रशी किती छान गार लागते. इथं सतत एखादा बाबा असायचा. म्हातारी मंडळी कायम इथं बसून असायची.
    बाळू म्हणतो,"हे म्हातारे बसल्या-बसल्या काय गप्पा मारतात, ते तुला माहीत नाही."
 " काय बोलतात." मी विचारलं.
"सांडूतात्या एकदा म्हणत होते की, गफ़ुरची सून शबाना काय वावटळ दिसती. तिला पाह्यलं की मला कसंतरीच होतं."
"सांडूतात्या तसा रंगेलच आहे. म्हातारं सालं लय कंडाळ! " रामू म्हणाला.
साले हे सगळे म्हातारे हापशावर येणा-या बायकांना अन मुलींना सारखे न्याहाळून पाहात असतात. हापसा मारतांना वाकल्या की ह्यांच्या नजरा नको तिथं टिकलेल्या असतात." बाळूनं माहिती पुरवली.


क्रमशः

रघुनाथदादा पाटील यांच्या आगामी कादंबरीतून.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

for more details : visit facebook page