०८ ऑगस्ट, २०११

आगामी कादंबरीतून..

छान शिकवण्यात कुलकर्णी मॅडम एक नंबर होत्या. मॅडम नेहमी म्हणायच्या," अरे बाबांनो, तुमचं दुर्दैव, की मराठीचा अभ्यासक्रम बदलला. आता तुम्हाला मराठीची गोडी वाटावी, भाषा शिकण्याची आवड निर्माण व्हावी असा अभ्यासक्रम निवडायच्या ऎवजी बहुदा जातीपाती अन लेखक पाहून अभ्यासक्रम ठरवला जातोय.आमच्या वेळेला एक बालविराची कविता होती.
’खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या, ऊडवील राई राई एवढ्या.’
किंवा
रंगरंगुल्या सानसानुल्या
गवतफ़ुला रे गवतफ़ुला
असा कसा रे मला लागला
सांग तुझा रे तुझा लळा.
अशा कविता होत्या.
आत्ताच्या तुमच्या कविता अन धडे वाचले की आमच्याच पोटात गोळा ऊठतो. तुम्हाला म्हणूनच मराठी अवघड वाटते. ब-याच मंडळींना तर मराठी आवडत नाही."
मॅडम असं छान छान बोलायच्या. त्यांच्याकडून कविता ऎकायलाही मजा यायची. त्या कविता आता का नाहीत? आम्हाला त्या वाचायला त्या कुठे मिळतील? असे प्रश्न पडायचे.
मॅडमनी एकदा एक कविता ऎकवली होती. मला खूप आवडली होती ती कविता! आमच्या वर्गातला अर्जुन तर ती कविता छान सुरात गायचा!
या झोपडीत माझ्या
राजास जी महाली.....
मला वाटायचं अर्जुनची झोपडी असल्याने त्याला ही कविता जरा जास्तच आवडात असावी. त्याने ही कविता मॅडमकडून पुर्ण लिहून घेतली होती.

क्रमशः

1 टिप्पणी:

for more details : visit facebook page