पावसाचे दिवस असल्याने रोज कसं अंधारून येत होतं. ढगांची आकाशात जत्रा भरायची. अधून मधून पांढुरके ढगांचे पुंजके एकडून तिकडे पळायचे. मला असं वातावरण खूप आवडायचं. कधी कधी सोसाट्याचा वारा देखील सुटायचा. पावसाचे टप्पोरे थेंब शाळेच्या पत्र्यावर तांडव करायचे. अशा वेळी अभ्यासात लक्षच लागत नव्हतं. खिडकीतून पावसाच्या सरी दिसायच्या. असं वाटायचं समोरच्या वरांड्यात उभं राहून हातात धारा पकडाव्या. काळे सर स्वतः देखील खिडकीजवळ ऊभे राहून पाऊस पहात हरवून जायचे! खिडकीजवळ जायला मिळावं किंवा बाहेर वरांड्यात जायला मिळावं अशी मनापासून ईच्छा होत होती. पावसाचा जोर वाढला. वारा थांबला होता. मागच्या बाजूला पत्रे गळायला लागली, तसा आमचा वर्ग गळकाच होता. मागे मुलांच्या जागेवर आणि सरांच्या टेबलावर गळायचं. एवढं निमीत्त आम्हाला जागेवरून ऊठायला पुरेसं ठरलं. मागे मुलांचा गोंधळ सुरू झाला. मी आणि अनिलनं ऊठून टेबल बाजूला सरकवला आणि तसेच दरवाजाशेजारी ऊभे राहीलो.सरांनी मुलांना पुढे-पुढे सरकायला सांगितलं. सरांचं लक्ष नाही असं पाहून मी बाहेर जाऊन पनाळाखाली हात धरला. हात ओला झाला. अंगातोंडावर देखील पाण्याचे तुषार पडले; लगेच पुन्हा वर्गात आलो, तरी देखील सरांनी पाहीलेच. सर नुसतेच हसले. मग ईतर मुलांनाही थोडा धीर आला.व ते ऊठून खिडकीतून पाऊस पाहू लागले. एक दोघं बाहेर गेले, हळू-हळू सगळा वर्ग वरांड्यात आणि खिडकीजवळ जाऊन ऊभा राहीला.
वर्ग गळका असण्याचा असा देखील फ़ायदा होतो हे आमच्या शिवाय कुणालादेखील कळणारं नव्हतं!
शाळेच्या समोर आणि मागे मैदानावर पावसाचे पाणि वाहू लागले. पाण्याचा रंग चहासारखा झाला. माती मिसळल्याने पाण्याचा रंग बदलला. सर म्हणाले,"बघा पाणी ऊताराच्या दिशेने वहातंय."
एवढं तर आम्हालाही दिसत होतं, परंतु सर काहीतरी.........
क्रमशः
माझ्या आगामी कादंबरीतून...
रघू व्यवहारे,
औरंगाबाद.
०५/०८/२०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा