०१ सप्टेंबर, २०२०

तुम्ही ठरवलं तर!

 आपल्या औरंगाबाद शहरात जेव्हा तुम्ही प्रवास करता; गाडीवर जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात, तेव्हा नाकातोंडात धूळ जाते. एकही रस्ता धड नाही. आता काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते झालेत; पण त्यालाही लगोलग तडे गेलेत. रस्त्यांचा उतार नीट नसल्याने जागोजागी पाणी साचलेले दिसते.  वाहने सतत धूळ उडवत फिरत असतात. वाहनांची वर्दळ इतकी की, धुळीला खाली बसायला वेळच मिळत नाही! रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, छोट्या-छोट्या दुकाना, हॉटेल्स, गॅरेजेस; आणि या सर्वांनी नावाचे जे बोर्ड बनवलेत, ते आणून रस्त्यावर ठेवलेत. आधीच अतिक्रमणाने रस्ते छोटे झालेले.  त्यात दुतर्फा असलेली अवैध पार्किंग; आणि त्यात भरीस भर म्हणून पुन्हा या दुकानदारांचे बोर्ड.  कित्येक ठिकाणी हॉटेल समोर उघडे पाणी सांडपाणी तसेच  बिस्किटाचे, दूधबॅग चे कव्हर्स, प्लास्टिकच्या पिशव्या आणि असं बरंच काही इतस्ततः पसरलेलंत.  या रस्त्याच्या कडेला माखलेल्या धुळीत काही ठिकाणी फळांच्या गाड्या, तर काही ठिकाणी इतर साहित्याच्या हातगाड्या;  आणि रस्ता गिळंकृत करणारे अतिक्रमण. फळांच्या गाड्यावर कापलेली कलिंगड किंवा इतर फळे तशीच उघडी पडलेली. तो गाडीवाला रुमालाने माशा हाकलतोय.  त्याच्या जगण्याचा आधार तेवढाच आहे! काही ठिकाणी जुन्या पडक्या इमारती, त्या भिंतीला पकडून कशातरी तग धरून उभ्या आहेत. गाड्यांचे हॉर्न सतत किंचाळत असतात. तरुण मुलं बेभान गाड्या पळवतात; त्यांना अडवणार कोणीच नाही. रस्त्यावरची गर्दी तशी मिश्र प्रकारातली.  तुरळक पायी चालणारे सोडले तर जास्तीत जास्त दुचाकी-चारचाकी, रिक्षा, शाळेच्या छोट्या छोट्या व्हॅन्स आणि या सगळ्यांच्या गराड्यात आत  रस्त्यावर एक पांगळा सरपटणारा माणूस! तो या गर्दीतून वाट काढत रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करतोय. 

शहरात सार्वजनिक शौचालये तशी कमीच, सार्वजनिक स्वच्छतागृह ही कमीच; आणि जी आहेत एकदम बकाल अवस्थेत. अत्यंत अस्वच्छ आणि गलिच्छ.  बहुतांश ठिकाणी त्याच्या बाहेरच्या भिंतीवरच लोकांनी आपला कार्यक्रम उरकलेला. माणसांचे आवाज कमीच ऐकायला येतात. सारखी वाहनांची धडधड आणि कर्कश्श वाहतुक!
रस्त्याच्या बाजूलाच भाजी भेळ किंवा इतर काही खाद्यपदार्थ विकणार्‍या गाड्या.  त्याभोवती काही लोकांची गर्दी.  लागूनच पाणीपुरीच्या गाड्या! बिनबोभाटपणे!  या गाडी वाल्यांसाठी कुठली हॉकर्स झोन वगैरे तयार केलेले नाहीत.  मनाला येईल तसं;  पाठीमागे असलेल्या घर मालकाला दरदिवशी शंभर ते पाचशे रुपयांच्या दरम्यान वाटेल ती एक रक्कम द्यायची,  दोघांमध्ये ठरेल ती रक्कम द्यायची, आणि बिनबोभाटपणे हे रस्ते अडवून बसायचं. त्यात रस्त्यावरची धूळ वगैरे! उघड्यावरती विकले जाणारे पदार्थ हे तपासणारी कोणतीही व्यवस्था काम करताना दिसत नाही. अन्न व औषधी प्रशासन नावाची संस्था कधीच तसदी घेत नाही!  महानगरपालिकेला याबद्दल काही घेणेदेणे नाही. स्वच्छता नावाचा कर लोकांकडून महानगरपालिका केंद्र सरकार वसूल करतात;
पण स्वच्छतेच्या नावावर दरमहा लाखोंची बिले उचलणारा गुत्तेदार मात्र कोणताही अंतर्गत रस्ता झाडाझुड किंवा साफसफाई करताना दिसत नाही! याबाबत महानगरपालिकेकडे चौकशी केली असता तिथले अधिकारी तुम्हाला मुळीच जुमानत नाही. स्थानिक काराभाऱ्याचा प्रशासनावर वचक असायला हवा होता.  त्यांचा तो वचक आहे ही, तो फक्त गुत्तेदार यांची बिले काढण्यासाठी, फाईल घेऊन फिरण्यात आणि आपली कामे करून घेण्यात! स्वार्थ साधण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यापुरताच. सामान्यांच्या जगण्यात आपण काही बदल घडवू शकतो यावर त्यांचा स्वतःचाच विश्वास नाही. शहरातील वस्त्यांची गरज काय? त्यांची मागणी काय? त्यांचे खरे प्रश्न काय?
इथे स्थानिक मतदार किती? मतदार यादीत बाहेरून नावे किती घातलीत? याबाबत चौकशी केली असता वेगळ्याच गोष्टी कानावर येतात. कित्येक ठिकाणी नोंदलेल्या वस्त्या, माणसं पण; त्यातील मतदार इथं मात्र शहरात राहताना दिसत नाही.
शहरातील असे कितीतरी प्रश्न आहेत, मित्रांनो जे आपण सगळे मिळून सोडवू शकतो. किंबहुना सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हेच आपले पहिले काम आहे. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, स्थानिक कारभारी आणि प्रशासन हे करत नसेल तर हातावर हात धरून बसता येणार नाही. तुमची मनापासून तयारी असेल तर आपण बदल घडवू शकतो!
याबाबत काय करता येण्यासारखा आहे? तुम्हाला काय वाटतं? त्याबाबत सूचना करा. आपली मत मांडा. समाजाप्रती आपलं असलेले उत्तरदायित्व आणि आपल्या बुद्धीचा आपल्या समजूतीचा वापर शहराच्या विकासासाठी करावा, असं वाटत असेल तर...... 
आपल्या अमूल्य सूचना जरूर द्याव्यात. आम्ही त्या सूचनांवर काम करू! आम्ही आपला यथोचित सन्मान करू! राजकारणापलीकडे आपण काही बदल घडवायचा एवढा एकच उद्देश्य घेऊन काम करू.  येणाऱ्या पिढ्यांसाठी एक सुंदर शहर आपल्याला घडवता येऊ शकते. यासाठी तुमची साथ हवी आहे! 
लक्षात ठेवा आपण काहीही करू शकतो!
तुम्ही सगळं बदलू शकता. तुम्ही कोणाला महानगरपालिकेत बसवू शकता; तर तुम्ही त्यांना महानगरपालिकेतून हाकलू सुद्धा शकता.  तुमच्यातलीच काम करणारी मंडळी निवडून चांगल्या माणसांच्या मागे उभे रहा! आम्ही आहोतच! आम्हाला राजकारण नाही करायचे; आम्हाला राजनीति बदलायची आहे! 
ही बदलेलही. पण ...... 
तुम्ही ठरवलं तर!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

for more details : visit facebook page