२८ ऑक्टोबर, २०११

जानी दुश्मन - भाग दोन

ऎन सनासुदीचे तीन दिवस बेपत्ता झालेला जानी दुश्मन आज अचानक अवतरला.
"वहिणी, मला खूप भूक लागली, काही खायला द्या ना."  तो वहिणीला म्हणाला.
"भावजी फ़क्त दोन मिनीट हं." वहिणी म्हणाली.
"वहिणी मॅगी करताहेत का, ’बस दो मिनीट’." मी हसत म्हणालो.
"आत्ता करते कांद्याचं थलिपीठ."
वहिणी काही करत बसू नका, जे असेल ते द्या. फ़रसान, चिवडा काहीही चालेल." तो म्हणाला.
"कुठे होतास तीन दिवस?" मी विचारलं.
"ईथंच होतो रे."
"मग लक्ष्मीपुजनाला का नाही आलास? गावाकडे गेलतास का?"
"नाही रे इथंच होतो, जरा कामात होतो."
त्यानं पेपर हातात घेतला, अन बातम्या चाळू लागला.
                   बाहेर ताशा वाजवण्याचा आवाज येऊ लागला. काय वाजतय हे पाहण्यासाठी आम्ही दोघं दरवाज्यात जाउन ऊभं राहीलो. एक रंगानं काळी-सावळी.... कसली काळी-सावळी एकदम काळीकुळीत बाई..एका लहाणग्याला कुशीत घेऊन ताशा वाजवत होती. फ़ाटकी साडी, केसांच्या झिंज्या कडेवरील मुल एकदम कुपोषीत..हात पाय बारीक झालेले... सोबत एक सात आठ वर्षाचा मुलगा. खाली फ़्रॉक, वरती ऊघडाबंब. कपाळावर गंध लावलेला, गळ्याला, कानाला, गालावर रंग फ़ासलेला. हातात एक सोट घेउन स्वतःला मारतोय. कडाड-कडाड आवाज करत स्वतःला सोट मारतोय. बाई वाजवतीय.. केवीलवाणा चेहरा करून, काही दानधर्म करा, पाच रुपये द्या ना दादा; अशी विनवणी करतेय..
तिचा असला अवतार पाहून तिची दया येण्याऎवजी मला तिची किळस वाटली. तोपर्यंत वहिणी अन दादा दरात येऊन आमच्या पाठीशी ऊभे. ही बाई सरळ घरात घुसते की काय म्हणून वहिणी थोड्या घाबरल्या, अन आत गेल्या.
"तुम्ही आत या अन दरवाजा लोटून घ्या."वहिणी असं दादाला म्हणाल्या.
"चला रे आत चला." दादा म्हणाला.
"जाऊ दे यार, ह्यांना कामधंदा करायला नको, नुसतं आयतं बसून खायला हवं." मी म्हणालो.
तो आत आला, मी दरवाजा लावून घेतला.
                  तो छोटा मुलगा कडाकड अंगावर सोट ऊठवतोय. त्याची आई ताशा वाजवतीय..काकुळतीला येऊन विनवणी करतीय...एकदम लाचार...मी अजुनही खिडकीतून पाहतोय, मला तिच्या वाजवण्याचा त्रास होतोय.तो मुलगा आता समोरच्या घराकडे निघाला. त्यांनी ह्याला येतांना पाहून दरवाजा लावला.
बाईचा आवाज आता कर्कश्श...."वाढ ओ माय....गरीबाला दान दे... भीक दे...तुहे पोरं सुखात राहतील."
टीव्ही वर मराठवाड्यातील कुपोषनावर एक माहीतीपट चालू... मला ती कुपोषीत मुलं पाहून त्यांची कणव आली.
"सालं सरकार, काही उपाययोजना करतं की नाही."
"............................." जानी दुश्मन शांत.
"लोकांनी तरी अशा लोकांना खायला द्यावं यार." मी म्हणालो.
वहिणींनी तोपर्यंत कांद्याचं थालपीठ आणलं. आमच्या दोघांच्या हातात दोन प्लेट दिल्या.
वहिणी छान थालपीठ करते.
जानी दुश्मन ने एक घास खाल्ला. दुसरा तुकडा मोडला, अन काहीतरी स्वगत बोलत प्लेट घेऊन ऊठला.
"काय म्हणालास?" मी  विचारलं.
हा दरवाजा ऊघडून अंगणात. त्या बाईला आवाज दिला. तिला कंपाऊंड मध्ये बोलाऊन बसायला सांगितलं. अन हातातली प्लेट तिच्यासमोर केली.
"अरे, हे काय रे? रात्रीचं आहे ते देऊ ना आपण तिला."
"................................."
"वहिणी रात्रीची पोळी-भाजी आणा बरं." मी म्हणालो.
"ती राहू दे, ती मी खातो." जानी दुश्मन म्हणाला.
"अरे साजूक तुप लावलेलं थालपीठ होतं."
                  मला थोडं वेगळंच वाटलं. सालं रात्रीचं दिलं असतं ना तिला. तोपर्यंत ती बाई अन तो मुलगा थालपीठ बकाबका खात होते. खूप भुकेले होते बहुदा. त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहत जानी दुश्मन कुठेतरी हरवलेला.  त्यांच्या पोटात अन्न गेल्याने ते सुखावले. चेह-यावरची तृप्ती पाहून मलादेखील बरं वाटलं. वहिणींनी आणखी थालपीठ वाढलं.
आत्ता दोन मिनीटापुर्वी मी कुपोषीत मुलं पाहूण वांझोटी सहानुभूती दाखवत होतो. प्रत्यक्ष कृती मात्र शुन्य. एखाद्या न्युज चॅनलवर जशी चर्चा करून आपण फ़ार मोठं समाजकार्य करतोय, अन आपल्याला कुणालाही कसलेही प्रश्न विचारायची मुभा आहे असं समजणा-या संपादकांसारखी माझी अवस्था आहे. प्रत्येक ईश्यु कॅश करणे एवढाच हेतू असण्यासारखं होतं ते.
                   सालं आपण समाजसेवा करायची म्हणतो ते पण शिळं पाकं, फ़ेकायचं अन्न असं खायला देऊन. तेच अन्न स्वतः खाऊन हातातलं ताट असं देण्यासाठी फ़क्त जानी दुश्मनच हवा. आपला तो पिंड नाही.आपण शिळंपाकं अन्न देऊन पुण्य कमावल्याच्या भ्रमात वावरतो.
           तांब्या भर पाणी पिऊन ती बाई अन तो मुलगा तृप्त झाले. त्या लहाणग्याला अन मुलाला असं पाहून वहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी डोळ्याच्या कडा टिपल्या. माझी मलाच लाज वाटली. आपण ह्याच्या पासंगाला देखील पुरणार नाही. हे मला सुचायला हवं होतं मला का नाही सुचलं? मी विचार करू लागलो, हा जन्माला येतांनाच कसली तरी अस्वस्थतेची गुटी पिऊन आलाय. आणि हा असा स्वछंद जीव मित्र असण्याच तरी आपलं नशीब आहे...
प्रत्येक वेळी हा मला असा माझाच विकृत चेहरा दाखवतो. मी विचार करू लागलो.
                  आपण स्वतः मंदीरात साधी ऊदबत्ती लावायला जात नाही, अन वर्गणी देऊन पुण्य केल्याच्या भ्रमात वावरतो. मुळात वर्गणी जमा करायची लाजीरवाणी वेळ आली याबद्दल काहीही वाटत नाही, त्याचीही समर्थनं तयार आहेत आमच्याजवळ. म्हणूनच मंदीरात दिवा, धूप , अगरबत्तीसाठी घरटी पाचशे रुपये वर्गणी जमा करायची वेळ आली. गावोगाव एवढी मंदीरं आहेत...कुठेही वर्गणी नाही. वर्गणी देणा-यांना वाटतं आपण धर्माचं काम करतोय अन वर्गणीच्या नावाखाली हजारो रुपये जमा करणा-यांना पैसा खाण्याचा एक नवा मार्ग मिळाला.
               मला नेहमी कोडं पडतं, हे असं करायचं , हे मला का सुचत नाही? मी तर त्या बाईला ताट देऊ नको म्हणालो होतो.
वहिणीने पुन्हा थालीपिठ आणून दिलं. जानी दुश्मन नं ते संपवलं.थालपीठ छान झाल्याची पावती देऊन, सायंकाळी परत येतो म्हणून तो अंतर्धान पावला.
"काय घाईत असतो रे हा नेहमी?" दादा मला म्हणाला.
"हं........" मी.

         दुपारी बाळूचा फोन आला त्यानं सांगितलं की, जानी दुश्मन मागील तीन दिवस नायगावच्या झोपडपट्टीत असलेल्या समाजमंदीरात मुक्कामाला होता. माझ्याकडून विजयचे जुणे कपडे घेऊन गेला होता. सगळ्या मित्रांकडून फ़राळ अन काहीबाही जमा केलं, कपडे , फ़राळ अन स्वतःच्या पैशानं फ़टाके घेऊन तिथं मुलांसोबत दिवाळी साजरी केली.
            मागी तीन दिवसांचं कोडं सुटलं होतं. मी वहिणीला सांगितलं. दादा देखील होता समोर.
"तुझा मित्र बाकी ग्रेट आहे यार!" दादा म्हणाला.
मला खूप छान वाटलं.
"वहिणी म्हणाली,"लग्न झाल्यावर काय होईल ते होवो."



माझी एक कथा
रघुनाथदादा पाटील



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

for more details : visit facebook page